येत्या २९ एप्रिलला बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे नाव जेव्हा जाहीर करण्यात आले होते तेव्हापासूनच या चित्रपटातील नायक आणि नायिकेची नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. मात्र नुकताच यावरचा पडदा हटला असून आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकर मुख्य भूमिका साकारणार असल्याचे उघड झाले आहे. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. प्रसाद ओक यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. नुकतेच चित्रपटाची नायिका चंद्राची भूमिका साकारणाऱ्या अमृताने या भूमिकेबाबत आपले मत व्यक्त केले होते.

चंद्रा साकारणे हे खरं तर खूप मोठे आव्हानाचे काम होते. चंद्रा म्हणजे संघर्ष, त्याग, प्रेम, बलिदान, कृष्णभक्त आणि नृत्यांगना आहे. तिचा जीवनातला संघर्ष मी देखील गेल्या दोन वर्षांपासून अनुभवला आहे त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. वाजले की बारा या लोकप्रिय गाण्यानंतर अमृतासाठी चंद्रमुखी हा चित्रपट खूपच महत्वाचा आहे. त्यामुळे या भूमिकेबाबत ती खुपच उत्सुक आहे. मात्र एकीकडे अमृताची ही उत्सुकता एका मराठी अभिनेत्रीला पचनी पडली नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक हिने चंद्राच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली आहे. ही भूमिका मी अधिक चांगली केली असती असे नुकतेच मानसी नाईकने चंद्राच्या भूमिकेबाबत म्हटले आहे. एका मुलाखतीत चंद्रमुखी या चित्रपटाबद्दल बोलताना मानसी नाईकने हे धक्कादायक वक्तव्य केले आहे. तू ही भूमिका केली असती का? ह्या प्रश्नाचे उत्तर देताना मानसी नाईक म्हणते की, कदाचित मला हा चित्रपट ऑफर करण्यात आला असेल त्यामुळे मला याबाबत विचारण्यात आलं आहे.

परंतु मी याबाबत काहीही न बोललेलंच बरं…माझे या संपूर्ण टीमला आशीर्वाद आहेत. चित्रपटाचे लेखन करण्यापासून ते शूटिंग करणाऱ्या कॅमेऱ्यामन पर्यंत या सर्वांच्यावर मी खूप खुश आहे. पण मला असं वाटतं की मी यापेक्षा आणखी चांगली चंद्रमुखी साकारली असती… मानसीच्या या बोलण्याने तिने अमृतावर खोचक टीका तर केली नाही ना अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. मानसी नाईकने आजवर अनेक चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. बघतोय रिक्षावाला हे तिच्यावर चित्रोत झालेलं गाणं तुफान हिट ठरलं होतं. त्यामुळे मराठी चित्रपटात मानसी नाईकने मुख्य भूमिकेशिवाय आयटम सॉंग देखील साकारले आहेत. बहुतेक अवॉर्ड सोहळ्यात आणि वेगवेगळ्या मंचावर तिच्या नृत्याची अदाकारी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे लावणीकलावंतांचा बाज असलेली चंद्राची भूमिका देखील आपण अधिक सरस साकारली असती असेच तिचे म्हणणे तिच्या बोलण्यावरून स्पष्ट होताना दिसत आहे.