मराठी चित्रपट सृष्टीतील दिवंगत अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या पत्नी सुशीला मांढरे यांचे आज ३१ जानेवारी २०२२ रोजी निधन झाले आहे. सुशीला मांढरे या ९५ वर्षांच्या होत्या. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सूर्यकांत मांढरे आणि चंद्रकांत मांढरे या दोन्ही भावांनी मराठी चित्रपट सृष्टीतला एक काळ आपल्या अभिनयाने गाजवला आहे. ध्रुव या चित्रपटात सूर्यकांत मांढरे वयाच्या १२ व्या वर्षी बालभूमिकेत झळकले होते. बहिर्जी नाईक हा आणखी एक बालकलाकार म्हणून त्यांनी चित्रपट साकारला यात त्यांनी बाल शिवाजींची भूमिका निभावली होती.

भालजी पेंढारकर यांनीच वामन मांढरे हे त्यांचं मूळ नाव बदलून सूर्यकांत मांढरे असं दिलं होतं. फक्त प्रौढांसाठी असा मराठी चित्रपट म्हणून केतकीच्या बनात या चित्रपटात त्यांनी सर्जेरावची भूमिका रंगवली होती. गृहदेवता, बाळा जो जो रे, शिकलेली बायको, साधी माणसं, सांगत्ये ऐका, गनिमी कावा अशा अनेक दर्जेदार चित्रपटात सूर्यकांत मांढरे महत्वाच्या भूमिकेत झळकले. त्यांचे बंधू चंद्रकांत मांढरे यांनी देखील चित्रपट सृष्टीत स्वतःचा ठसा उमटवला. दोघांनी जवळपास १४ चित्रपटातून एकत्रित काम केले होते. या दोघा बंधूंना बऱ्याचदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका मिळाल्या त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीत छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की त्यांचेच नाव आणि चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. २६ डिसेंबर १९४७ साली सूर्यकांत मांढरे यांचे सुशीला पिसे यांच्यासोबत लग्न झाले. अभिनयाच्या चढ उतारात त्यांच्या पत्नीने त्यांना मोलाची साथ दिली. सूर्यकांत मांढरे हे अभिनयासोबतच उत्कृष्ट चित्रकार म्हणून ओळखले जात.

कोल्हापूरमध्ये राजाराम आर्ट गॅलरी आणि चित्रनगरी व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले होते. सूर्यकांत मांढरे २२ ऑगस्ट १९९९ रोजी निधन झाले पुण्यात त्यांच्या नावाने कलादालन होते त्यात त्यांनी काढलेली चित्रं, शिल्पकलाकृती आणि त्यांना मिळालेले पुरस्कार जतन करून ठेवले होते पुणे महापालिकेकडे ह्या सर्व वस्तू ठेवल्या मात्र त्यांच्या मुलांनी त्या सर्व वस्तू कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्त केल्या होत्या. त्यांच्या पत्नी सुशीला मांढरे यांच्या पश्चात दोन मुलं, सुना आणि नातवंड असा परिवार आहे. सुशीला मांढरे यांना आमच्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली