मराठी सृष्टीतील दिग्गज अभिनेते राजा गोसावी यांची मुलगी शमा देशपांडे यांनी त्यांच्या आई वडिलांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. राजा गोसावी प्रथमच त्यांच्या पत्नीसोबत या फोटोतून पाहायला मिळत आहेत. मराठी सृष्टीतील विनोदाचे राजे अशी ओळख त्यांना मिळाली होती. लाखाची गोष्ट, अखेर जमलं, असला नवरा नको ग बाई, भ्रमाचा भोपळा, वाट चुकलेले नवरे अशा अनेक चित्रपट आणि नाटकांमधून त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली होती. मराठी सृष्टीत एवढं मोठं नाव असूनही त्यांच्या मुलांनी त्यांच्या नावाचा कधीच वापर केला नाही. राजा गोसावी यांना एकूण ५ अपत्ये तीन मुलं आणि दोन मुली.

सर्वांनीच आपल्या लहानपणी नाटकांतून काम केले पण शमा देशपांडे या त्यांच्या धाकट्या मुलीने त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेलेला पाहायला मिळाला. घरचीच प्रॉडक्शन कंपनी असल्यामुळे कुठला कलाकार जर प्रयोगाला येऊ शकला नाही तर त्यावेळी त्यांची धाकटी मुलगी शमा देशपांडे ती उणीव भरून काढायच्या. वयाच्या १८ व्या वर्षीच किरण देशपांडे यांच्याशी शमा देशपांडे यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुलीही झाल्या. लग्नानंतरचा प्रवास मात्र शमा देशपांडे यांच्यासाठी खूपच खडतर होता. आर्थिक अडचणींमुळे स्वतःला गुंतवून ठेण्यासाठी आणि पर्यायाने घर चालवण्यासाठी अभिनय क्षेत्रात त्या दाखल झाल्या. पण यात मी वडिलांच्या नावाचा कधीच उपयोग केला नाही असं त्या आवर्जून सांगतात. उलट राजा गोसावी यांची मुलगी म्हटल्यावर अधिकच अडचणी वाढत गेल्या. मोठ्या कलाकाराची मुलगी त्यामुळे फ्लर्ट करता येणार नाही मग कामही द्यायला नको असे सगळेच जण दबकून राहायचे. त्यामुळे त्यांनी शमा देशपांडे याच नावाने हिंदी सृष्टीत स्वतःची ओळख मिळवली. लग्नानंतर आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या पहिल्या पतीचे मानसिक खच्चीकरण झाले त्यामुळे ते दारूच्या आहारी गेले . त्यांना लिव्हर सायरोसिस झाला होता आणि यातच त्यांचे निधन झाले. दरम्यान सात वर्षे आजारपणामुळे शमा देशपांडे नवऱ्याची काळजी घेत असताना खूप धावपळ व्हायची त्यांच्या नवऱ्याला दवाखान्यात दाखल करण्यासाठी कधी कधी चेहऱ्यावर चढवलेला मेकअप उतरवून यायला लागत असे. दवाखान्यात दाखल केल्यावर पुन्हा शूटिंगला जावे लागायचे.

आशीर्वाद, घर एक मंदिर, कुटुंब अशा अनेक मालिका आणि हिंदी चित्रपटातून शमा देशपांडे यांनी नाव मिळवलं होतं. खंत एवढीच होती की लेकीचं हे यश पाहण्यासाठी राजा गोसावी हयातीत नव्हते. कुटुंब या हिंदी मालिकेत एकत्रित काम करत असताना शमा देशपांडे यांची आणि सहकलाकार साई बल्लाळ यांच्याशी ओळख झाली. साई बल्लाळ शेट्टी हे त्यावेळी अविवाहित होते. त्यांनीच पुढाकार घेत शमा देशपांडे यांना लग्नाची मागणी घातली. दोन मुलींना स्वीकारून त्यांनी शमा देशपांडे यांच्यासोबत लग्नही केले. शमा देशपांडे यांच्या दोन्ही मुलींची लग्न झाली असून त्या त्यांच्या घर संसारात रममाण झाल्या आहेत. राजा गोसावी हे मराठी सृष्टीतील एवढं मोठं नाव पण शमा देशपांडे यांनी मराठीत खूप कमी काम केलं. याबाबत त्या म्हणतात की, मला मराठीत काम करायला नक्कीच आवडलं असतं पण मला त्याबाबत कधी विचारण्यातच आलं नाही. वयाच्या १८ व्या वर्षीच घर संसारात रमली असल्याने मी अभिनयाचे धडे देखील घेऊ शकले नाही. मी एक चोखंदळ अभिनेत्री आहे त्यामुळे त्याच पठडीतल्या भूमिकांना मी स्वीकारते असे शमा देशपांडे सुलेखा तळवळकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत म्हणतात.
