Breaking News
Home / जरा हटके / मराठी सृष्टीला लाभलेल्या रुबाबदार अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत का? एका अपघातात अरुण सरनाईक मुलगा आणि पत्नीचे झाले होते निधन

मराठी सृष्टीला लाभलेल्या रुबाबदार अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत का? एका अपघातात अरुण सरनाईक मुलगा आणि पत्नीचे झाले होते निधन

मराठी सृष्टीला लाभलेला रुबाबदार आणि देखणा नायक म्हणून अरुण सरनाईक यांच्याकडे पाहिलं जातं. आज ४ ऑक्टोबर हा अरुण सरनाईक यांचा जन्मदिवस, या दिवसाचे औचित्य साधून दिवंगत अभिनेते अरुण सरनाईक यांच्या बद्दल माहिती नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. अरुण सरनाईक हे मूळचे कोल्हापूरचे, त्यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीततज्ञ तर काका निवृत्तीबुवा सरनाईक हे शास्त्रीय गायक म्हणून ओळखले जात. त्यामुळे अरुण सरनाईक यांना कलेचा वारसा हा त्यांच्या घरातूनच मिळाला होता. महाविद्यालयिन शिक्षणानंतर अरुण सरनाईक यांनी इचलकरंजीतील अभियांत्रिकी कारखान्यात नोकरी केली. गायन , तबला वादन अशा गुणांनी परिपूर्ण असलेल्या अरुण सरनाईक यांनी नाटकातून रंगभूमीवर आपलं पहिलं पाऊल टाकलं. ‘शाहीर परशुराम’ हा त्यांनी अभिनित केलेला पहिला मराठी चित्रपट ठरला.

actor arun sarnaik daughter family
actor arun sarnaik daughter family

विठू माझा लेकुरवाळा, रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, मुंबईचा जावई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन , पाहुणी, गणगौळण, चंदनाची चोळी अंग अंग जाळी, घरकुल अशा चित्रपटातून त्यांनी दमदार भूमिका रंगवल्या. अरुण सरनाईक यांच्या रूपाने ७० च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीला बुलंद आवाज लाभलेला, उत्तम संवाद फेक करणारा आणि देखणा नायक मिळाला. त्यांनी गणगौळण, डोंगरची मैना सारख्या चित्रपटातून गाणी देखील गायली होती. पप्पा सांगा कुणाचे, एक लाजरा न साजरा मुखडा ही अरुण सरनाईक यांनी गायलेली गाणी आजही तेवढीच लोकप्रिय असलेली पाहायला मिळतात. चित्रपटातून जयश्री गडकर, उमा भेंडे, अनुपमा, कानन कौशल, आशा काळे अशा नायिकेसोबत अरुण सरनाईक यांची जोडी जुळून आली. पंढरीची वारी या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अरुण सरनाईक यांची निवड करण्यात आली होती. मात्र शुटिंगहून परतत असताना २१ जून १९८४ रोजी त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि या भीषण अपघातात अरुण सरनाईक यांच्या सोबत असलेला मुलगा आणि पत्नीचेही दुःखद निधन झाले. काळाचा हा घाला अरुण सरनाईक यांची मुलगी सविताला मात्र पोरकं करून गेला. त्यांची मुलगी सविता सरनाईक या त्यावेळी एमबीबीएसच्या शिक्षणासाठी मिरजला थांबल्या होत्या. सविता सरनाईक यांचे शालेय शिक्षण कोल्हापूर मध्ये झाले तर मुंबईत महाविद्यालयिन शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मिरजला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेतले. त्यानंतर डिप्लोमा इन चाईल्ड हेल्थ ही पदवी घेऊन त्यांनी अनेक वर्षे बालरोगतज्ज्ञ म्हणून सेवा केली.

savita sarnaik  naiknaware family
savita sarnaik naiknaware family

कॉलेजमध्ये असताना त्यांनी क्रीडा आणि अभिनय क्षेत्रात बक्षिसं देखील मिळवली होती. सविता सरनाईक यांनी पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर व्यावसायिक रणजित नाईकनवरे यांच्यासोबत संसार थाटला. नील आणि सनिया ही दोन अपत्ये त्यांना आहेत. अरुण सरनाईक यांचा नातू नील नाईकनवरे हा देखील वडिलांचा व्यवसाय सांभाळत आहे तर नात सानिया ही मेलबर्न येथे वकिलीचे शिक्षण घेत आहे. अरुण सरनाईक यांनी सामाजिक बांधिलकी जपत आनंदग्राम येथे रुग्णांची सेवा केली होती. समाजसेवेचा हा वारसा त्यांच्या मुलीने देखील जपलेला पाहायला मिळतो. गेल्या अनेक वर्षांपासून सविता सरनाईक या समाजसेविका म्हणूनही काम करतात. सिम्बॉयसिसच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी १५ वर्षे आरोग्यसेवा केली होती. पुण्यातील चाकण परिसरातील अनेक शाळांसाठी त्यांनी आरोग्य शिबिरे आयोजित केली. पुण्यातील आपटे रोड जवळ असलेल्या स्नेहधाम या आश्रमातील ज्येष्ठांच्या मदतीसाठी त्या पुढे सरसावल्या आहेत. ‘लाईफ मंत्राज’ या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. वडील अरुण सरनाईक आणि आजोबा शंकरराव सरनाईक यांच्यावर पुस्तक लिहिण्याची त्यांची मनापासून ईच्छा आहे. त्यांची ही ईच्छा लवकरात लवकर पूर्ण होवो जेणेकरून अरुण सरनाईक यांच्याबद्दल प्रेक्षकांना अधिक जाणून घेता येईल.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *