स्क्रिप्टपासून स्क्रिनपर्यंत ते सिनेमाचे दादा होते आज स्मृतिदिनी त्यांच्या चाहत्यांनी जागवल्या आठवणी

गुडघ्यापर्यंतची पँट आणि तिचा नाडा त्यावर हाफ कुर्ता, ओठावर रेषेसारखी असलेली मिशी, डोक्यावर अगदी बारीक केस हा लूक आठवला की जे नाव ओठावर येते ते म्हणजे दादा कोंडके. ऐतिहासिक सिनेमांची लाट ओसरून मराठी पडदय़ावर विनोदी सिनेमांनी कात टाकली होती. तमाशापट, ग्रामीण लहेजा या तर मराठी सिनेमाच्या जमेच्या बाजू होत्याच. त्याच काळात दादा कोंडके यांनी विनोदी सिनेमाला नवा अस्सल सहजसुंदर चेहरा दिला. त्याच दादा कोंडके यांचा आज 14 मार्च रोजी स्मृतीदिन आहे. आजच्याच दिवशी 1998 ला दादा कोंडके उर्फ कृष्णा कोंडके हे रत्न काळाच्या पडदयाआड गेले.

दादा कोंडके उर्फ कृष्णा कोंडके यांचे वडील गिरणी कामगार होतें, त्यांचे सुरवातीचे जीवन लालबागमधील चाळीत गेले. दादांना एका ज्योतिषाने सांगितले होते कि तू आयुष्यात कधीही प्रगती करणार नाही. परंतु दादा चाळी पासून शिवाजी पार्क मध्ये मोठ्या बंगल्या पर्यंत पोहचले. भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या सिनेमातून दादांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात झाली. विच्छा माझी पुरी करा यानाटकाच्या प्रयोगांना १९६५ मध्ये सुरूवात झाली. या नाटकामधूनच दादांना जास्त ओळख मिळाली. या नाटकाचे लेखन वसंत सबनीस यांनी केले होते. या नाटकाचे जवळपास १५०० प्रयोग झाले होते. याचा शेवटचा प्रयोग मार्च १९७५ मध्ये हैद्राबादला झाला. १९७५ मध्ये पांडू हवालदार हा सिनेमा आला. यामध्ये त्यांनी पांडू नावाचे पात्र साकारले. त्यानंतर महाराष्ट्रात पोलिसांना लोक पांडू म्हणून संबोधू लागले. दादा व जब्बार पटेल यांचा वाद लोकप्रिय होता कारण दादांच्या लोकप्रियतेवर हिंदी चित्रपट सृष्टी नेहमी बोटे मोडत.

दादा निर्मित पहिला सिनेमा सोंगाड्या १९७१ मध्ये आला. नाम्या नावाच्या युवकाचे पात्र जो कलावतीच्या प्रेमात अखंड बुडाला ते पात्र दादांनी रेखाटले. सोंगाड्या भयंकर हिट झाला. तेव्हापासून भोळा नायक ही मुख्य शैली दादांनी सुरु ठेवली. लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ त्यांनी केले. त्यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न होते. त्यांनी याची कबुली स्वतः एका मुलाखतीत दिली होती. हे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले. मृत्यूनंतरही वादांनी दादांचा पिच्छा पुरवला. वाद होता दादांच्या वारसा हक्कांबाबत. दादांनी मृत्युपत्रात आपली संपत्तीची कार्यवाह म्हणून एक संस्था स्थापन केली होती. विश्वस्त म्हणून उषा चव्हाण, डॉ. अनिल वाकणकर, साबीर शेख ,गजानन शिर्के व वसंत भालेकरांचा समावेश होता. पुढे दादांच्या वारसांनी त्यांच्या मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान दिले व त्यांची सर्व संपत्ती वादग्रस्त ठरली.