मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी दिवाळीच्या दिवसात चार चाकी वाहनांची खरेदी केली आहे. तुझ्यात जीव रंगला मालिका फेम अभिनेता हार्दिक जोशी आणि याच मालिकेतील बरकतची भूमिका साकारणारा अमोल नाईक तसेच अभिनेत्री सायली संजीव यांनी नुकतीच चार चाकी वाहनाची खरेदी केलेली पाहायला मिळते. तर अभिनेता अमेय वाघ याने स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मर्सिडीज खरेदी केली आहे. “पुढचा प्रवास खडतर असेल… तर तो Mercedes ने करावा म्हणतो!” असे कॅप्शन देऊन गाडीसोबतचा फोटो शेअर केला आहे. माझ्या वाढदिवसादिवशी मी स्वतःलाच नवीन गाडी भेट दिली असल्याचे तो म्हणतो.

अमेय वाघ बहुप्रतिक्षित असलेल्या “झोंबिवली” या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. वैदेही परशुरामी, ललित प्रभाकर आणि अमेय वाघ यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहेत. चित्रपटाच्या टिझरवरूनच ह्या चित्रपटाची उत्सुकता वाढली होती. ह्या वर्षी ३० एप्रिल रोजी झोंबिवली चित्रपट प्रदर्शित होणार होता परंतु सुरक्षेच्या कारणास्तव त्याची तारीख पुढे ढकलण्यात येऊ लागली. शासनाने निर्बंध हटवल्याने आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपट गृहात पाहायला मिळणार आहे. आज ५ वाजता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जात आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट लवकरच पाहायला मिळणार म्हणून कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांत मराठी सिनेमांतील नाविन्य, अनोख्या कथा आणि वेगवेगळ्या विषयांवर आधारित सिनेमांची होणारी निर्मिती पाहता मराठी सिनेमांनी अनेकांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांनीही त्या सर्व सिनेमांना खूप प्रेम दिले आहे आणि पाठिंबा दर्शविला आहे. ‘झोंबिवली’ सिनेमाचे पहिले पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र त्याचीच चर्चा झाली होती. प्रेक्षकांनी या दोन्ही गोष्टींना प्रचंड प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सिनेमाप्रती उत्सुकता दर्शवली.

झोंबींचे उत्कृष्ट व्हिज्युअल, बॅकग्राऊंड म्युझिक यामुळे मोशन पोस्टरला एक वेगळा इफेक्ट मिळाला होता आणि त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता जास्त प्रमाणात वाढली आहे. अमेय वाघने आजवर अनेक चित्रपटातून दर्जेदार भूमिका निभावल्या आहेत त्यातीलच झोंबिवली हा चित्रपट त्याच्यासाठी महत्वाचा ठरत आहे. अमेयने आज त्याच्या वाढदिवशी जी मर्सिडीझ कार घेतली आहे तिची बेसिक किंमत हि जवळपास ४० लाख रुपये असून ऑन रोड प्राईज हि ४७ लाखांच्या जवळपास असल्याचं बोललं जातंय. एका मराठी कलाकाराने इतकी महाग गाडी घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण त्यासाठी अमेयने खूप मेहनत घेतली आहे. देश परदेशात जाऊन मराठी नाटके देखील गाजवली आहेत. हे त्याच्या कष्टाचं फळ आहे. फास्टर फेणे, मुरांबा, गर्लफ्रेंड अशा चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर येत राहिला आहे. २००८ साली आईचा गोंधळ या चित्रपटातून त्याने मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. 3 इडियट्स या बॉलिवूड चित्रपटात चतुरच्या भूमिकेसाठी त्याने ऑडिशन दिली होती मात्र त्याला ही भूमिका मिळाली नाही. नाटकांतून काम करत असताना २०१२ सालच्या अय्या या हिंदी चित्रपटातून त्याने बॉलिवूड चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते.