ऐतिहासिक कथा, सामाजिक विषय यातून मराठी सिनेमा पुढे आला आणि ग्रामीण ढंगात स्थिरावला. गावाकडच्या कथा मराठी सिनेमाने गाजवल्या त्याकाळात गावरान ठसक्यात अभिनयाचा तडका देणाऱ्या अभिनेत्रींची एक वेगळीच क्रेझ होती. गुडघ्यापर्यंत नऊवारी साडी, अंबाडा, ठसठशीत कुंकू असा नायिकेचा लूक असायचा. शहरातील सुटाबुटातला नायक आणि गावरान नायिका हा ट्रेंड आलेल्या मराठी सिनेमाच्या प्रवाहात एक नाव गाजलं ते म्हणजे प्रेमा किरण. अभिनेत्री आणि नृत्यांगना प्रेमा किरण यांचे आज १ मे रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठ सिनेमाचा गावरान ठसका हरपला. मराठी सिनेमाविश्वातील भरभराटीच्या काळाचा साक्षीदा असलेल्या प्रेमा किरण यांनी अभिनय, नृत्य, सिनेमा निर्मिती या क्षेत्रात भरीव योगदान दिलं आहे.

प्रेमा किरण या अस्सल कलाकार होत्या. लहानपणापासून नृत्यामुळे त्यांच्यावरील अभिनयाचे संस्कारही पक्के झाले. शालेय वयातच त्यांनी ऑर्केस्ट्रॉमध्ये काम करण्यास सुरूवात केली. गाणं म्हणायचं तर कधी नृत्य असा त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यातूनच अभिनयाचाही ध्यास लागला. धुमधडाका या सिनेमात त्यांना संधी मिळाली. विनोदी सिनेमांना त्या काळात बहर आला होता. तोपर्यंत भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम यांच्या कल्पनेतील सिनेमांचं युग मागे पडलं होतं. १९८० नंतर मराठी सिनेमा ग्रामीण जीवनाचे रंग दाखवत होताच पण त्या भर पडली ती शहरी आणि ग्रामीण कथांच्या फ्यूजनची. हा ट्रेंड प्रेक्षकांना आवडू लागला. महेश कोठारे यांच्या दिग्दर्शनाने कॉमेडी रोमँटीक स्टोरी मराठीत हिट ठरल्या. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरूण, वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे या कलाकारांनी धमाल केली. याच काळात प्रेमा किरण यांनी मराठी सिनेमातील गावरान नायिका तर कधी गावाकडची फटाकडी स्त्री उत्तमरित्या पडदयावर रंगवली. त्यांच्या बोलण्यातील ठसका प्रेक्षकांना आजही लक्षात आहे तो त्यांच्या अभिनयामुळेच. धुमधडाका सिनेमा म्हटलं की पहिल्यांदा आठवतं ते त्यातील पोलिसवाल्या सायकलवाल्या बिरेक लावून थांब हे गाणं. ३५ वर्षानंतरही हे गाणं आजही जेव्हा मिरवणुकीत, वरातीत वाजतं तेव्हा थिरकायला भाग पाडतं. या गाण्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत प्रेमा किरण झळकल्या. दे दणादण या सिनेमातही त्यांची लक्ष्यासोबत जोडी जमली. त्यांनी आजपर्यंत कुंकू झालं वैरी, गडबड घोटाळा, सौभाग्यवती, माहेरचा आहेर अशा अनेक सिनेमात काम केलं. त्या राजकीय पक्षातही सक्रिय होत्या. प्रेमा किरण यांनी उतावळा नवरा, थरकाप या सिनेमांची निर्मिती केली आहे. मराठीच नव्हे तर भोजपुरी, गुजराती, बंजारा, अवधी या भाषेतही त्यांनी काम केलं आहे.

झी मराठीवरील ‘हे तर काहीच नाही’ या कार्यक्रमात आल्यावर त्यांनी एक लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबतचा एक किस्सा देखील शेअर केला होता. त्यावेळी प्रेमाताई म्हणाल्या “माझा सिनेमा दे दाणादाण तुम्हाला माहीतच असेल. तो एक गोल्डन जुबली सिनेमा होता. पोलीस वाल्या सायकल वाल्या या गाण्याच्या शूटिंगवेळी महेश कोठारे यांनी आम्हाला दुपारच्या आत हे गाणं संपवायचं अशी ताकीद दिली होती. त्यानंतर शूटिंग सुरू असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांना सायकल नीट चालवता येत नव्हती. आणि अवघी दोन पावले पुढे जाऊ एवढं पुढे गेल्यावर त्यांनी प्रेमा यांना खाली पाडलं. असे प्रेमा या सायकलीवरून चक्क तीन वेळा पडल्या होत्या. याचाही उल्लेख त्यांनी पुढे केला. आणि त्या म्हणाल्या की, मी पडले म्हणून दे दणादण हिट झाला.” अशी हि हरहुन्नरी अभिनेत्री आज आपल्यात नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..