राजकारण आणि त्यामध्ये असलेल्या डावपेचांसह तस्करी, अंमली पदार्थांची विक्री, अपहरण अशा सर्व गोष्टी असलेले अनेक चित्रपट किंवा वेबसिरिज तुम्ही आजवर पाहिले असतील. मात्र राजकारण आणि वेश्या व्यवसाय हे समीकरण पहिल्यांदाच मरिठी भाषेत ‘रान बाजार’ या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये काम करणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रींची नावं ऐकून कदाचित तुम्ही चकितच व्हाल. आपल्या ‘प्राजक्तप्रभा’ या पुस्तकातील मनमोहक कवितांनी कवीप्रेमींना मंत्रमुग्ध करणारी तसेच ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोचलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. तसेच तिच्यासह तेजस्विनी पंडित, उर्मिला कोठारे आणि माधुरी पवार या अभिनेत्री प्रमुख पत्रांमध्ये दिसणार आहेत.

सदर वेबसिरीज ही राजकारण आणि वेश्या व्यवसायावर आधारित असल्याचे अंदाज बांधले जात आहेत. ज्यामध्ये सर्वच मराठमोळ्या अभिनेत्रींनी अतिशय बोल्ड आणि मादक सीन दिले आहेत. मराठी भाषेतील प्रथम ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या प्लॅनेट मराठीवर ही वेबसिरीज सुरु होनार आहे. तसेच १८ मे रोजी याचा टिजर प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री प्राजक्ताने काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘रान बाजार’चे पोस्टर आणि व्हिडिओ पोस्ट केले होते. पोस्टर पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, ” प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकीर्दीत विविध भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असलेली विविध पात्रं साकारण्याची, सतत काही तरी नवीन करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासू स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरित होऊन आणि तुम्हा मायबाप रसिकप्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न.” यासह अभिनेत्री तेजस्विनी पंडितने देखील पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “दोन फुलपाखरं फडफडली आणि सत्तेला बसला हादरा…! रानबाजार ट्रेलर येतोय १८ मे ला!” अभिनेत्रींनी शेअर केलेल्या पोस्टमुळे आता या वेबसिरिजचा ट्रेलर पाहण्याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.