सोशल मीडिया स्टार अशी ओळख मिळालेले बहुतेक कलाकार आता ऐसपैस गाडी खरेदी करताना दिसत आहेत. नुकतेच सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवलेल्या सोलापूर मोहोळ येथील गणेश शिंदे आणि योगिता शिंदे यांनी देखील नविकोरी गाडी खरेदी केली. या दोघांना त्यांच्या यशस्वी प्रवासासाठी चाहत्यांकडून भरघोस शुभेच्छा देखील मिळाल्या. आता आणखी एका अशाच सोशल मीडिया स्टारने मर्सिडीज गाडी खरेदी करून आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा स्टार आहे विनायक माळी. विनायक माळीच्या आगरी भाषेतील विनोदी व्हिडीओजना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. त्याच्या यशाचा प्रवास आता अधिकच द्विगुणित झाला आहे असे म्हणायला हरकत नाही कारण विनायक माळीने चक्क मर्सिडीज बेंझ सी क्लास या आलिशान गाडीची खरेदी केली आहे.

कॉमेडी स्टार म्हणून ओळख निर्माण केलेला विनायक माळीने घेतलेलया मर्सिडीज बेंझ सी क्लास कारची किंमत ६२ लाखांच्या घरात आहे इतकी महागडी कार आणि तेही इतक्या कमी वयात घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शेठ माणूस म्हणून ओळख निर्माण केलेला विनायक खऱ्या आयुष्यात देखील आता शेठ माणूस झालेला पाहायला मिळतोय. घेतली एकदाची…असे म्हणत विनायक माळीने यासंदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विनायक माळी हा सोशल मीडिया स्टार कसा बनला त्याचा आजवरचा प्रवास थोडक्यात जाणून घेऊयात…विनायक माळी हा रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मला त्याचे वडील नोकरीनिमित्त ठाण्यात वास्तव्यास होते त्यामुळे विनायकचे संपूर्ण शिक्षण त्याने ठाण्यातच पूर्ण केले. वकिलीचे शिक्षण घेत असतानाच विनायकला विप्रो कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली . काही कालावधीनंतर नोकरीत मन रमेना म्हणून त्याने सोशल मीडियावर हिंदी भाषेतून व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. याला प्रेक्षकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने आपल्या आगरी भाषेतूनच व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. त्याने बनवलेले गावरान आगरी भाषेतील ठसकेबाज विनोदी व्हिडीओ प्रेक्षकांना प्रचंड आवडू लागले. दादूस, आगरी किंग अशी ओळख मिळालेला विनायक माळी युट्युबवर चांगलाच हिट ठरू लागला.

त्याच्या या प्रसिद्धीची भुरळ मराठी सेलिब्रिटिना देखील होऊ लागल्याने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते विनायक माळी सोबत व्हिडीओ काढू लागले. युट्युबवर २२ लाखांहून अधिक सबस्क्राईबर्स असलेल्या विनायक माळीच्या व्हिडीओजला अल्पावधीतच लाखोंच्या संख्येने व्हीव्हज मिळू लागले आहेत. अर्थात विनायक माळीचे हे एकट्याचे यश नाही कारण तो त्याच्यासोबत अनेक कलाकारांनाही सोबत घेऊन जाताना दिसतो. बहुतेक अभिनेत्री देखील त्याच्या व्हिडिओतून प्रसिद्धी मिळवताना दिसल्या आहेत. मित्र मैत्रिणी नातेवाईक कॉलेज मधील शिक्षकांपासून लग्नातील लोकांपर्यंत सगळ्यांचा ह्यात खारीचा वाटा असल्याचं तो म्हणतो जिथे जाईल तेथील प्रेक्षक आणि चाहते नेहमीच साथ देतात त्यामुळेच मी आजवर इथवर पोहचल्याच तो आवर्जून बोलतो. त्यांचे हे यश दिवसेंदिवस वृद्धिंगत होवो हीच एक सदिच्छा आणि नव्या कोऱ्या मर्सिडीज बेंझ गाडी खरेदीबद्दल विनायकचे खूप खूप अभिनंदन