
यावेळी बिग बॉसचा तिसरा सिजन काहीसा हटके असलेला पाहायला मिळाला. अभिनय, संगीत, राजकारण आणि कीर्तन अशा विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या व्यक्तींचा कंटेस्टंट म्हणून बिग बॉसच्या घरात समावेश करण्यात आला आहे. यात जय दुधाने आणि मीनल शाह यांची नावे वेगळ्या अर्थाने घेतली जातील कारण हे कलाकार स्प्लिट्सव्हीला आणि रोडीज सारखे हिंदी रिऍलिटी शो गाजवून मराठी बिग बॉसमध्ये दाखल झाली आहेत. विशेष म्हणजे मीनल शाह ही अमराठी असली तरी तिच्या अस्खलित मराठी बोलण्याने ती मराठीच असल्याचे जाणवते. तसेच आपल्या कामगिरीमुळे मीनल प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे त्यामुळे मीनल शाह कोण आहे याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

मीनलचा जन्म मुंबईचा. ती लहान असतानाच तिचे आई आणि वडील दोघेही विभक्त झाले होते त्यामुळे मीनल आणि तिच्या भावाचा सांभाळ तिच्या आईनेच केला होता. वडील गुजराथी जरी असले तरी तिची आई मराठी असल्याने त्या दोघांचे शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले. तिचे शालेय शिक्षण वांद्रे पूर्व येथील आयइएस न्यू इंग्लिश स्कुल मराठी माध्यमातून झाले होते. त्यामुळे मराठी भाषेची उत्तम जाण तिला होतीच शिवाय आईनेच लहानाची मोठी केल्याने मराठी संस्कृतीबद्दल तिला विशेष आदर देखील आहे. मीनल ही उत्कृष्ट डान्सर, मॉडेल आणि ऍक्टर म्हणून ओळखली जाते. २०१७ साली एम टीव्हीच्या रोडीज या लोकप्रिय रिऍलिटी शोमध्ये ती कंटेस्टंट बनून गेली होती. यात कठीण टास्क खेळून ती सेमी फायनलिस्टपर्यँत पोहोचली होती. रोडीज या रिऍलिटी शोमुळे मिनलला तुफान प्रसिद्धी मिळाली अगदी सोशल मीडियावर तिच्या फॅनफॉलोअर्सची संख्या देखील वाढली होती. नानचाकू आणि मार्शलआर्टस् चे प्रशिक्षण घेतलेल्या मिनलला वेगवेगळ्या टास्कदरम्यान याचा खूप फायदा झाला होता. या रिऍलिटी शो नंतर मीनल काही जाहिरातीतून झळकली होती.

शिवाय वेगवेगळ्या इव्हेंटला परीक्षक म्हणून तिला बोलवण्यात येऊ लागले. मिनलने स्वतःचे युट्युब चॅनल सुरू केले आहे ज्यात तिचा रोडीजचा प्रवास आणि तिच्या डान्सचे व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील. हिंदी रिऍलिटी शो गाजवलेली मीनल आता मराठी बिग बॉसच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली आहे. यात ती प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहे. अमराठी असलेली मीनल आपल्या आईने दिलेल्या संस्कारामुळे मराठीच असल्याचे बिग बॉसच्या घरात येताना सांगत असते. माझा जन्म देखील एका सामान्य मराठी कुटुंबात झाला असेच ती मानते. हिंदी रिऍलिटी शो गाजवल्यानंतर मीनल आता मराठी बिग बॉसच्या घरात कुठपर्यंत मजल मारते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बिगबॉस मराठी सीजन ३ मध्ये आलेल्या अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या मीनल शाह हिला या पहिल्या वहिल्या मराठी रिऍलिटी शोनिमित्त खूप खूप शुभेच्छा…