
अभिनेता अविष्कार दारव्हेकर हा बिग बॉसच्या घरात आल्यापासून चांगलाच चर्चेत येत आहे. सुरुवातीला मालिका, चित्रपट आणि नाटकांतून लोकप्रियता मिळवलेला अविष्कार मधल्या काळात या झगमगत्या दुनियेपासून अचानक गायब झाला आणि पुन्हा नव्या दमाने एन्ट्री घेत कलाक्षेत्रात सक्रिय झाला. सुरुवातीला प्रमुख नायकाच्या भूमिका गाजवणारा अविष्कार कालांतराने सहाय्यक भूमिका निभावू लागला. ह्या गोजिरवण्या घरात, आभाळमाया, दामिनी, कुटुंब, देवाशपथ खोटं सांगेन खरं सांगणार नाही, जुईली, ती आणी इतर, किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी अशा चित्रपट आणि मालिका तसेच नाटकांचा तो एक महत्वाचा भाग बनला.

भूतनाथ या बालनाट्याची त्याने सिरीज काढून प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन केले. अविष्कार दारव्हेकर याचा मागील दोन पिढ्यांपासून कालाक्षेत्राशी संबंध आहे. अभिनयाचे बाळकडू त्याला त्याच्या घरातूनच मिळाले आहे. अविष्कारचे आजोबा म्हणजे प्रसिद्ध नाट्यकर्मी “पुरुषोत्तम दारव्हेकर” हे नागपूरच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मानाचं पान म्हणून ओळखले जात. कट्यार काळजात घुसली हे नाटक त्यांनी लिहून रंगभूमीवर आणलं होतं. याच नाटकावर आधारित कट्यार काळजात घुसली हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यात आला होता. दिग्दर्शक आणि गीतकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. घेई छंद मकरंद.., छळतसे काजळ काळी रात, यासारखी गीत त्यांनी लिहिली होती. सुरुवातीला त्यांनी शाळेत शिक्षकाची नोकरी केली होती त्यानंतर बालनाट्य लिहून ती प्रेक्षकांसमोर आणली. ‘रंजन कला मंदिर’ या नावाने त्यांनी स्वतःची नाट्यसंस्था उभारली होती. उपाशी राक्षस, मोरूचा मामा, पत्र्यांचा महल, आब्रा की डाब्रा , स्वर्गातील काळा बाजार, कट्यार काळजात घुसली या नाटकांची मेजवानी प्रेक्षकांच्या भेटीला आणली. १९६१ साली दल्ली दूरदर्शनच्या सहाय्यक संचालकपदी त्यांनी कामकाज पाहिले होते.

त्यानंतर मुंबईत येऊन त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये प्रोड्युसर म्हणून जबाबदारी संभाळली होती. २१ सप्टेंबर१९९९ रोजी त्यांचे निधन झाले. अविष्कारचे आजोबा ज्याप्रमाणे नाट्यसृष्टीत कार्यरत होते त्याप्रमाणे त्याचे वडील डॉ रंजन दारव्हेकर हे देखील रंगभूमीवरील कलाकार म्हणून ओळखले जातात. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या पश्चात रंजन कला मंदिरची जबाबदारी आता रंजन दारव्हेकर सांभाळत आहेत. रंजन कला मंदिरच्या माध्यमातून त्यांनी व्यावसायिक आणि हौशी नाटकांचे सादरीकरण केले आहे शिवाय काही नाटकांचे दिग्दर्शन देखील त्यांनी केले आहे. राज्य नाट्य महोत्सवात त्यांना अभिनय आणि दिग्दर्शनाची पारितोषिक मिळाली आहेत.नव्या पिढीला नाट्यक्षेत्रात आणण्यासाठी त्यांनी अनेक शिबिरं आयोजित केली आहेत आणि त्यातून नवोदित कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे. नाट्यसृष्टीत या दारव्हेकर कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अविष्कार दारव्हेकर याला देखील अभिनय क्षेत्रात मोलाची संधी मिळत गेली.