मराठी दूरदर्शनवर ७० च्या दशकात सायंकाळी सात वाजता घराघरात एक आवाज घुमायचा. शांत संयमी तरीही हातातील कागदावर असलेल्या बातमीचा रोख आपल्या आवाजाने अचूक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची ताकद असलेले वृत्तनिवेदन प्रदीप भिडे कायमचे काळाच्या पडदयाआड गेले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. ते ६४ वर्षाचे होते. गेल्या अनेक वर्षापासून ते दूरदर्शमध्ये वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत होते. भिडे यांच्या निधनाने, नमस्कार, आजच्या ठळक बातम्या हा आवाज कायमचा हरपला. आज मंगळवारी सायंकाळी ६ वाजता अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आज २४ तास बातम्यांच्या वाहिन्या आहेत, मात्र जेव्हा दिवसातून एकदाच सायंकाळी दिवसभरातील बातम्या देणाऱ्या दूरदर्शन या वाहिनीवर प्रदीप भिडे यांचे भारदस्त आवाजातील वृत्तनिवेदन ऐकण्यासाठी अनेक प्रेषक टीव्हीसमोर बसायचे. त्यांना नाटकाचीही पार्श्वभूमी होती. अनेक नाटकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या होत्या. पण वृत्तनिवेदनात त्यांनी आपलं स्थान व ओळख निर्माण केली. १९७२ साली त्यांनी दूरदर्शनमध्ये नोकरी स्वीकारली. १९७४ पासून भिडे हे वृत्तनिवेदक म्हणून कॅमेऱ्यासमोर आले. तेव्हापासून ३५ वर्षे भिडे यांनी वृत्तनिवेदक हे पद भूषवलं. वृत्तनिवेदकाबरोबरच, भिडे यांचा सूत्रसंचालन आणि मुलाखतकार म्हणूनही हातखंडा होता. त्याच्या कार्यकाळात त्यांनी दूरदर्शनवर घेतलेल्या अनेक मुलाखतीही गाजल्या. मराठी बातम्यांचा लोकप्रिय आवाज वृत्तनिवेदक प्रदीप भिडे याना आमच्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली…