अभिनेत्री उर्मिला निंबाळकर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळवताना दिसली. मग प्रेग्नन्सीवरून केलेले ट्रोलिंग असो वा एका ब्रँडेड लिपस्टिकमुळे तिच्यावर आलेला चोरीचा आळ या सर्वांमुळे सोशल मीडियावर उर्मिलाची बाजू सावरण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. उर्मिला निंबाळकर ही मराठी तसेच हिंदी मालिका अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मागील बऱ्याच दिवसांपासून उर्मिला आपल्या प्रेग्नन्सीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. मंगळवारी ३ ऑगस्ट २०२१ रोजी तिने बाळाला जन्म दिला असून एक छानशी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ती आई झाल्याचे आपल्या चाहत्यांना कळवले आहे. उर्मिलाने मुलाला जन्म दिला असून या पोस्टमध्ये ती नेमकी काय म्हणाली ते पाहुयात….

“वडिलांवर, भावावर वैभव निंबाळकर, दिरावर सूचित गुमस्ते, सासऱ्यांवर, आणि सगळ्यांत जास्त चुकलं म्हणजे, नवऱ्यावर सुकीर्त गुमस्ते अति प्रेम असलं की, रंगभुमीपेक्षा जास्त नाट्य निर्मिती खऱ्या आयुष्यात होऊन, हिरो ची एन्ट्री होते माझा आयुष्यात ३ ॲागस्टला सकाळी हिरोची एन्ट्री झालीय!” उर्मिला निंबाळकर हीने काही दिवसांपूर्वी आपल्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ युट्युबवरील तिच्या चॅनलवर अपलोड केला होता . पुण्यातील प्रसिद्ध ढेपे वाडा येथे तिचा हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला होता. तिच्या या व्हिडिओला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून अक्षरशः लाईक्सचा वर्षावही झाला. उर्मिला नेहमीच व्हिडिओजच्या माध्यमातून चाहत्यांना मेकअप बद्दल , साडी नेसण्याबद्दल सजेशन देत असते. त्याचमुळे तिचे मार्गदर्शन करणारे हे व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात पाहिलेही जातात. मधल्या काळात प्रेग्नन्सीचे फोटो शेअर केल्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोल होत होती. ‘आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?’ ‘एवढं काय हिचं प्रेगन्सीचं कौतुक’? असे अनेक वाद आणि त्यावर तिने दिलेली उत्तरे यांची चांगलीच चर्चा रंगली होती. अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने संगीत सम्राट या रियालिटी शोचे रोहित राऊत सोबत सूत्रसंचालन केले होते. दिया और बाती हम, मेरी आशिकी तुम से ही, एक तारा, दुहेरी अशा मालिका आणि चित्रपटातून अभिनय साकारला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनोलॉजीची पदवी तिने प्राप्त केली आहे. ९ फेब्रुवारी २०१३ रोजी उर्मिलाने सुकीर्त गुमस्ते यांच्यासोबत लग्न केले. उर्मिला नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवरून व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. तुर्तास अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिचे आई झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन…