मराठी सृष्टीला लाभलेली सोज्वळ आणि तितकीच देखणी अभिनेत्री म्हणून “उमा भेंडे” हे नाव आजही प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात आहे. खरं तर उमा हे नाव त्यांना लता दिदींनीच दिलं होतं त्यांचं मूळ नाव होतं अनसूया साकरीकर. मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या उमा भेंडे यांनी १९६० सालच्या ” आकाशगंगा” चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. मधुचंद्र, आम्ही जातो अमुच्या गावा, दोस्ती, काका मला वाचवा, भालू, स्वयंवर झाले सीतेचे या आणि अशा तमिळ, तेलगू, छत्तीसगडी चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली होती.

मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांच्याशी त्यांनी विवाह केला. ‘नाते जडले दोन जीवांचे’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते या चित्रपटानंतर त्यांनी लग्न केले. ‘श्री प्रसाद चित्र’ ही त्यांची निर्मिती संस्था, यातून त्यांनी भालू, प्रेमासाठी वाट्टेल ते, चटकचांदनी अशा चित्रपटांची निर्मिती केली. १९ जुलै २०१७ रोजी उमा भेंडे यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. उद्या उमा भेंडे यांचा स्मृतिदिन आहे त्यांच्या स्मृतिदिनास विनम्र अभिवादन करूयात… प्रसाद आणि प्रसन्न ही उमा आणि प्रकाश भेंडे यांची दोन मुले आहेत. प्रसाद भेंडे हा त्यांचा थोरला मुलगा. प्रसाद भेंडे हा मराठी सृष्टीत सिनेमॅटोग्राफर म्हणून काम सांभाळतो आहे. “दुनियादारी” हा त्याचा पहिलाच चित्रपट खूपच यशस्वी झाला. या चित्रपटामुळे त्याला अनेक पुरस्कार मिळाले. लोकमान्य, मितवा, वेलकम जिंदगी, प्यारवाली लव्हस्टोरी, मला काहीच प्रॉब्लेम नाही, सविता दामोदर परांजपे, बेफाम, सातारचा सलमान या गाजलेल्या चित्रपटासाठी त्याने काम केले आहे. लोकमान्य चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

आपल्या आई वाडीलांप्रमाणे पडद्याच्या समोर राहून काम करण्यापेक्षा प्रसादने कॅमेऱ्यामागे राहून मराठी सृष्टीत आपला चांगलाच जम बसवला आहे. हिंदी मालिका अभिनेत्री “श्वेता महाडिक भेंडे” ही प्रसादची पत्नी आहे. गुड्डन तुमसे ना हो पायेगा, कृष्णदासी, एक श्रीनगर स्वाभिमान अशा हिंदी मालिका तिने अभिनित केल्या आहेत. उमा भेंडे यांची सून आणि तेही हिंदी मालिकांमधून आपले नाव लौकिक करत आहे हे कित्येकांना माहीत नसावे. श्वेताने “लोकमान्य-एक युगपुरुष” या मराठी चित्रपटातही महत्वपूर्ण भूमिका साकारली होती हे बहुतेकांना माहीत नसावे. लोकमान्य चित्रपटात टिळकांची पत्नी सत्यभामाबाईंची भूमिका तिने साकारली होती. ‘अभिर’ हा प्रसाद आणि श्वेता भेंडे यांचा मुलगा आहे. तर प्रसन्न भेंडे हा उमा आणि प्रकाश भेंडे यांचा धाकटा मुलगा आहे. किमया भेंडे हे प्रसन्नच्या पत्नीचे आणि उमा भेंडे यांच्या धाकट्या सुनेचे नाव. प्रसन्न आणि किमया हे दोघेही ‘Roger that production’ ही निर्मिती संस्था सांभाळत आहेत.