अग्गबाई सासूबाई या मालिकेत तेजश्री प्रधान महत्वाच्या भूमिकेत झळकली होती. यात तिने शुभ्राचे पात्र आपल्या अभिनयाने चांगलेच गाजवले होते. या मालिकेनंतर तेजश्री प्रधान कुठल्याच मालिकेत दिसली नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी ती मालिकेत पुन्हा यावी अशी आशा बाळगली आहे. अग्गबाई सासूबाई या मालिकेचा सिकवल काढण्यात आला होता त्यात तेजश्री मुख्य भूमिका साकारताना दिसावी अशी अपेक्षा होती मात्र तिच्या जागी अभिनेत्री उमा हृषीकेश हिची वर्णी लागली होती. अर्थात मालिकेतून निरोप घेतल्यावर तेजश्रीने काही जाहिराती साकारलेल्या पाहायला मिळाल्या.

तर काही युट्युब व्हीडिओ आणि म्युजिक व्हिडिओतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. साटंलोटं , cool सदरा हे तिने साकारलेले काही प्रोजेक्ट आहेत. याशिवाय तेजश्री प्रधान आणि तिची खास मैत्रीण कीर्ती शिंपी यांनी मिळून Tek Dreams या नावाने स्वतःची निर्मिती संस्था उभारली. यातून त्यांनी संरक्षक देवदूत हा समाजाला मेसेज देणारा व्हिडीओ बनवला होता. याचे लेखन स्वतः तेजश्रीने केले होते तर आशुतोष पत्कीने याचे दिग्दर्शन केले होते. बहुप्रतिक्षित बबलू बॅचलर हा तेजश्रीचा हिंदी चित्रपट नुकताच रिलीज झाला होता. या छोट्या मोठ्या प्रोजेक्टमधून तेजश्री प्रेक्षकांसमोर येत राहिली असली तरी ती मालिकेत दिसावी अशी अपेक्षा अनेकांनी केली होती. प्रेक्षकांची ही अपेक्षा आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण तेजश्री प्रधान लवकरच मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करताना दिसणार आहे. ही मालिका आहे स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा… तेजश्री लवकरच फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. परंतु ती कोणत्या भूमिकेत झळकणार आहे याचा अजून उलगडा झालेला नसल्याने प्रेक्षकांमध्ये तिच्या आगमनाची आतुरता शिगेला पोहोचली आहे.

याअगोदर फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत अनेक कलाकारांची हजेरी लावली होती. शेखर फडके, सई रानडे हे कलाकार या मालिकेत छोट्या पण तितक्याच महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळाले होते. त्यामुळे तेजश्री कोणती भूमिका साकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागून राहिले आहे. सध्या फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत एक घटना घडली आहे. अचानक पाळणा बंद पडल्याने पाळण्यात बसलेली मुलं आणि तिथे उपस्थित असलेले सर्वच लोकं खूप घाबरून गेले आहेत. यात कीर्ती धाडस दाखवत पाळण्यावर चढून मुलांना वाचवताना दिसणार आहे. त्यामुळे एक देवदूतच आम्हाला वाचवायला आली आहे अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी दिलेली पाहायला मिळणार आहे. कीर्तीच्या ह्या धाडसाचे आता कौतुक होत आहे. त्यामुळे मालिका आता आणखी एका रंजक वळणावर येऊन ठेपलेली पाहायला मिळत आहे. अर्थात मालिकेत तेजश्रीचे आगमन कधी होणार याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.