
मराठी सृष्टीतील बरेचसे कलाकार अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त व्यवसाय क्षेत्रात उतरलेली पाहायला मिळाली आहेत. यात बऱ्याचशा नामवंत कलाकारांचा समावेश आहे. आता चित्रपट अभिनेत्री सिया पाटील हिने देखील व्यवसाय क्षेत्रात उतरण्याचे धाडस दाखवले आहे. अभिनेत्री सिया पाटील हिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी आपण जाणून घेऊयात. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी हे सिया पाटीलचे गाव. पाचवीपर्यंतचे शिक्षण स्थानिक शाळेतून घेतल्यानंतर सियाने पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले.

एम कॉम पदवीचे शिक्षण घेण्यासोबतच तिने कम्प्युटर डिप्लोमाचे शिक्षण घेतले. कराटेमध्ये ब्लॅकबेल्ट मिळवलेल्या सियाने खेळात देखील प्राविण्य मिळवले होते. हॉलीबॉल नॅशनल लेव्हल आणि बास्केटबॉल स्टेट लेव्हलला ती खेळली आहे. सिया पाटील ही द्राक्ष बागायतदार शंकरराव पाटील यांची कन्या आहे. २०१० साली शंकरराव पाटील यांचे निधन झाले होते. आटपाडी येथील साखर कारखान्याचे ते संचालक म्हणून कार्यभार सांभाळत होते. सिया तिच्या बाबांसोबत खूपच कनेक्टेड होती अगदी चित्रपटाच्या शुटिंगवेळी ती तिच्या बाबांसोबत तासंतास गप्पा मारत बसायची. शाळेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमातून सियाला डान्समध्ये नेहमी बक्षिसं मिळायची पण आपल्याला इन्स्पेक्टर व्हायचंय या उद्देशाने ती पुन्हा आपल्या मार्गावर परतायची. मात्र कॉलेजमध्ये गेल्यावर मॉडेलिंगचे वेध लागले यातूनच काही जाहिरातींमधून तिला झळकण्याची संधी मिळाली. पुढे नाटकात काम करण्याची संधी मिळत गेली. मात्र तिने घरून कुठलीही आर्थिक मदत घेण्याचे टाळले. दरम्यान आपण काहीतरी करायचं या हेतूने पुणे सातारा रोडवरील भापकर पेट्रोल पंपावर जॉब केला, दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतले यातून स्वबळावर शिक्षणाचा आणि राहण्याचा खर्च भागू लागला. चल गंमत करू या तिच्या पहिल्या चित्रपटाची जाहिरात पेपरमध्ये छापून आली होती.

आपल्या मुलीचा चित्रपटातील फोटो पाहिला तेव्हा तिच्या वडिलांना याबाबत कुठलीच कल्पना नव्हती की आपली मुलगी चित्रपटात काम करते. ही बातमी समजल्यावर त्यांनी आसपासची संपूर्ण थेटर बुक करून गावकऱ्यांना मोफत चित्रपट दाखवला होता. स्वबळावर चित्रपट सृष्टीत ओळख मिळवलेल्या सिया पाटीलने गर्भ, बोला अलख निरंजन, डोंबिवली रिटर्न, पारख नात्यांची, धूम२ धमाल, गाव थोर पुढारी चोर, चल धर पकड अशा अनेक चित्रपटातून मुख्य तर कधी सहाय्यक भूमिका निभावल्या. प्रोफेशनल पायलटचे प्रशिक्षणही तिने काही दिवसांपूर्वी घेतले होते. आता सिया पाटील व्यवसाय क्षेत्रात देखील उतरली आहे. मिलेनियम पॅराडाईज , ठाकूर व्हिलेज, कांदिवली पश्चिम, मुंबई येथे तिने “S.Sense salon and spa” या नावाने व्यवसाय सुरू केला आहे. नुकतेच तिच्या सलूनमध्ये बिग बॉसफेम विकास पाटीलने हजेरी लावून तिला या व्यवसायानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ माझा हा नवीन लूक तिच्या सलूनमध्येच कोरला आहे’ असे म्हणत विकासने सियाचे भरभरून कौतुक केले आहे. सिया पाटीलला या नव्या व्यवसायानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा…