बऱ्याचदा नोकरी करणारी मंडळी एक आवड म्हणून गावी जाऊन शेती व्यवसायात गुंतलेली पाहायला मिळतात. परंतु शेती व्यवसाय करणे म्हणजे खूप मोठ्या कष्टाचे काम असते असे मानले जाते. हा शिक्का पुसून काढत मराठी अभिनेत्री गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या पतीसह शेती करण्यात गुंतली आहे. ही अभिनेत्री आहे “संपदा कुलकर्णी”. एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका तसेच दिग्दर्शिका अशा विविध भूमिकेत संपदा कुलकर्णीला तुम्ही पाहिले असेल मात्र एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही ती आपले नाव लौकिक करताना दिसत आहे.

ज्यांना शेती करण्याची ईच्छा आहे त्यांच्यासाठी योग्य दिशा दर्शवण्याचे काम संपदा कुलकर्णी आणि पती राहुल कुलकर्णी गेल्या काही वर्षांपासून करत आहेत. हे दाम्पत्य शेतीकडे कसे वळले याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात…वयाच्या ४० शी नंतर क्षेत्र बदलायचं असा निर्णय संपदा आणि राहुल कुलकर्णी यांनी घेतला होता. राहुल हे जे जे स्कुल ऑफ आर्टस् चे विद्यार्थी गेल्या काही वर्षांपासून ते जाहिरात क्षेत्रात क्रिएटिव्ह हेड म्हणून कार्यरत होते. परंतु शेती करायची या हट्टापायी दोघांनी आपल्या कोकणातील फूणगुस या गावाची वाट धरली. तिथे गेल्यावर एक कोकणी पद्धतीने टुमदार घर बांधले. वडिलोपार्जित डोंगरावर असलेली जमीन प्रथमतः दोघांनी नांगरून काढली. कष्ट करून उत्पादन घेण्यास सुरूवात केली. महत्वाचं म्हणजे सेंद्रिय खतांचाच वापर करून शेती करायची असा निर्णय घेतला त्यामुळे त्यांच्या शेतातील भाजीपाला थेट मुंबईत पोहोचता झाला. काजू, आंबा अशी फळे आणि भाजीपाला संपूर्णतः नैसर्गिक पद्धतीने पिकवला जाऊ लागल्याने त्याला मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली.

आनंदाचं शेत (farm of happiness) नावानं उभारलेल्या स्वप्नातील शेतात आता चक्क ऍग्रो टुरिझमच्या व्यवसायामुळे लोकांची गर्दी होताना दिसत आहे. शेती शिकायची मग ती कशी? याची उत्तरं सध्या ऑनलाइन प्रशिक्षण शिबिरात देण्याचे कार्य हे दोघे करत आहेत. यातून लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना मिळतो आहे. संपदा कुलकर्णीची लाडकी लेक म्हणजेच अभिनेत्री “शर्वरी कुलकर्णी” हिचे लग्नही नुकतेच पार पडले होते. मार्च महिन्यात विभव बोरकर यांच्याशी शर्वरीचा विवाह झाला. शर्वरी मराठी नाट्य तसेच मालिका अभिनेत्री आहे. आनंदी हे जग सारे मालिकेत तिने मीरा ची भूमिका साकारली होती शिवाय काही नाटकातूनही ती झळकली आहे. शर्वरीने ललित कला केंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत याशिवाय नृत्य आणि वेगवेगळ्या रेसिपीज बनवण्याची देखील तिला भारी हौस आहे