
मागच्या काही दिवसांत अनेक मराठी सेलिब्रिटींच्या घरी चिमुकल्यांचे आगमन झालेले पाहायला मिळाले. आता लवकरच अभिनेत्री खुशबू तावडे- साळवी ही देखील कुणी तरी येणार येणार गं म्हणत बेबी शॉवरचे फोटो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेले पाहायला मिळाले होते. अभिनेता संग्राम साळवी आणि खुशबुने हे फोटो इंस्टाग्रामवरून पोस्ट केले होते. त्यांच्या या बातमीने अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या पाहायला मिळाल्या. खुशबू- संग्राम या सेलिब्रिटी कपल सोबतच आता आणखी एक सेलिब्रिटी कपल ही आनंदाची बातमी शेअर करताना दिसत आहे. फत्तेशीकस्त चित्रपट फेम अभिनेता “अंकित मोहन आणि त्याची पत्नी अभिनेत्री रुची सवर्ण ” ह्यांनी देखील बेबी शॉवरचे फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी कळवली आहे.

अंकित मोहन याने फत्तेशीकस्त या चित्रपटाव्यतिरिक्त ‘फर्जंद’, ‘एक थी बेगम’, ‘महाभारत’, ‘शोभा सोमनाथ की’, ‘हैवान’, ‘ कुमकूम भाग्य’ या मालिका आणि चित्रपटातून अभिनय साकारला आहे. त्याच्या शरीर यष्टीमुळे मराठी चित्रपटातला बाहुबली अशीही ओळख त्याला मिळाली आहे. अंकितची पत्नी रुची सवर्ण ही देखील हिंदी मराठी मालिका अभिनेत्री आहे. ‘ सख्या रे’ या मराठी मालिकेतून तिने प्रियंवदा ची भूमिका साकारली होती. प्यार का बंधन, कुमकुम भाग्य, कुंडली भाग्य, घर आजा परदेसी अशा हिंदी मालिका तिने अभिनित केल्या आहेत. कुमकुम भाग्य सारख्या आणखी काही हिंदी मालिकेतून हे दोघेही एकत्रित झळकले होते. २०१५ साली रुची आणि अंकित मोहन विवाहबद्ध झाले होते. हिंदी मालिकेत झलकल्यानंतर या दोघांनी मराठी सृष्टीकडे आपली पावले वळवली. अंकित मोहन लवकरच दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहे. अंकित आणि रुची हे दोघेही आई बाबा होणार असल्याचे कळताच त्यांच्यावर कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.