
खऱ्या आयुष्यात PSI असलेली ही सौंदर्यवती आहे अभिनेत्री “पल्लवी जाधव”. जालन्याच्या पोलीस अधिक्षक कार्यालयात दामिनी पथकात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांचा जीवनप्रवास खूपच खडतर होता. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेतगावात एका शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबात पल्लवीचा जन्म झाला. शेतमजुरी करत असलेल्या आईवडिलांसोबत पल्लवी देखील दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायला जायची. त्यामुळे उन्हाचे आणि गरिबीचे चटके काय असतात ते तिला चांगलेच ठाऊक होते. यातूनही शिक्षण कधीच सोडायचे नाही हा ध्यास तिने तिच्या मनात पक्का रुजवला होता. शालेय शिक्षण झाल्यावर कन्नड येथील शिवाजी विद्यालयात जाऊन तिने मानसशास्त्र विषयातून बीएची पदवी मिळवली.

पुढील शिक्षणासाठी औरंगाबादला जावे लागणार मात्र तिच्या वयाच्या मुलींची लग्न झाल्याने घरच्यांकडून तिच्या पुढील शिक्षणाला विरोध होऊ लागला. अशातच कुटुंबातील एका आजोबांनी तिच्या शिक्षणाला पुरेपूर पाठिंबा दर्शवला. त्यानंतर पल्लवीने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले त्यासोबतच एमपीएससीचा अभ्यासही सुरू केला.पुढे पीएसआयच्या परीक्षेत उत्तम गुणांनी यश मिळवले. पुढे जाऊन डीवायएसपी व्हायची तिची ईच्छा आहे. अधिकारी बनल्यावर आपण आपल्या पायावर आता खंबीरपणे उभे आहोत तर आता आपले आवडते छंद जोपासवेत या हेतूने सौंदर्यवती स्पर्धेत सहभागी होण्याचे तिने ठरवले. “ग्लॅमॉन मिस इंडिया २०२०” च्या स्पर्धेत उपविजेती होण्याचा बहुमान तिने पटकावला असून ” मिस फोटोजेनिक ऑफ ग्लॅमॉन मिस इंडिया” हा पुरस्कारही तिने प्राप्त केला. पल्लवी जाधव लवकरच “हैद्राबाद कस्टडी ” या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रमुख नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. ख्वाडा आणि बबन या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटाचे अर्धे शूटिंग झाले असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीस येईल अशी आशा व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी असलेल्या पल्लवी जाधव हिच्यासाठी हा चित्रपट खूपच खास ठरणार आहे आणि अभिनेत्री बनण्याचे तिचे स्वप्नही या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होणार आहे. या चित्रपटानिमित्त खऱ्या आयुष्यात पीएसआय असलेल्या पल्लवी जाधव हिला आमच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा…