
मराठी मालिका तसेच नाट्य अभिनेत्री ‘प्रेरणा निगडीकर’ नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. प्रेरणा निगडीकर ही फ्री लान्सर मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने ललित कला केंद्रमधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. राज्यनाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाची अनेक पारितोषिक तिनं पटकावली आहेत. स्टार प्रवाह या वाहिनीवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून प्रेरणाने मामीची भूमिका साकारली होती. स्वातंत्र्याच्या काठवरती, शांतता कोर्ट चालू आहे अशी अनेक नाटकं तिने अभिनित केली आहेत. या नाटकांमधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक देखील झाले. दूरदर्शनवरील भक्तीरंग या मालिकेचे सूत्रसंचालन तिनं केलं आहे.

प्रेरणा निगडीकर ही मूळची साताऱ्याची परंतु सध्या ती मुंबईत वास्तव्यास आहे. प्रेरणा नुकतीच मराठी चित्रपट आणि मालिका दिग्दर्शक “स्वप्नील मुरकर” ह्याच्यासोबत विवाहबद्ध झाली आहे. स्वप्नील मुरकर ह्याने बालमोहन विद्यामंदिर येथून शालेय शिक्षण आणि डी जी रुपारेल इथून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिका स्पर्धेतून त्याने सहभाग दर्शवला होता. लॉक”‘डाऊन दरम्यान सोनी मराठी वाहिनीवर आठशे खिडक्या नऊशे दारं ही मालिका प्रसारित झाली होती. या मालिकेचे दिग्दर्शन स्वप्नीलने केले होते. प्रत्येक कलाकार आपआपल्या मोबाईलवरून चित्रीकरण करून ते स्वप्नीलकडे पाठवत होते ह्या सर्व चित्रीकरणाची एकत्रित जडणघडण करताना सुरुवातीला खूप त्रास झाला मात्र हा एक वेगळा अनुभव स्वीकारण्याचे धाडस त्याने दाखवले. या मालिकेला प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला होता. रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेशी तो निगडित आहे. लाडाची मी लेक गं या मालिकेचेही दिग्दर्शन त्याने केले आहे. प्रेरणा निगडीकर आणि स्वप्नील मुरकर या नवदाम्पत्याना आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन!!!
