सन मराठी ही नवी वाहिनी मराठी मनोरंजन सृष्टीत दाखल झाली. जाऊ नको दूर बाबा, आभाळाची माया, संत गजानन शेगावीचे, सुंदरी, कन्यादान अशा वेगवेगळ्या धाटणीच्या आणि नव्या दमाच्या मालिका या वाहिनीने प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. अर्थात जाणते कलाकार आणि उत्तम कथानकाच्या जोरावर या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. त्यामुळे या वाहिनीने स्वतःचा असा स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे. सन मराठी वाहिनीवरील सुंदरी या मालिकेत अनेक नवखे कलाकार प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. याच मालिकेतील अभिनेत्री नुकतीच विवाहबद्ध झाली आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे प्रणाली नांगरेपाटील.

काही दिवसांपूर्वीच प्रणालीच्या घरी तिच्या लग्नाची लगबग सुरू झाली होती. मेहेंदी सोहळ्यातील आणि हळदीच्या सोहळ्यातील काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. १३ मे रोजीच आमचे लग्न पार पडले असे म्हणत प्रणालीने आज तिच्या लग्नाचे फोटो शेअर केलेले पाहायला मिळत आहेत. तिच्या या आनंदाच्या बातमीने तिच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. १३ मे रोजी प्रणाली नांगरेपाटील हिने अनिकेत चव्हाण सोबत लग्नगाठ बांधली आहे. प्रणालीने सुंदरी या मालिकेत मालतीची भूमिका निभावली आहे. या मालिकेव्यतिरिक्त प्रणाली झी मराठीच्या मालिकेत झळकली होती. घेतला वसा टाकू नको या मालिकेत तिने छोटीशी पण तितकीच महत्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय काही जाहिरातींसाठी तिने मॉडेलिंग केलं आहे. कॉलेजमध्ये असताना प्रणालीने विविध राज्यनाट्य स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. यातुनच तीला मालिकेतून झळकण्याची नामी संधी मिळाली आहे. नुकतीच विवाहबद्ध झालेल्या प्रणाली नांगरेपाटील आणि अनिकेत चव्हाण यांचे अभिनंदन!