प्राजक्ता माळीने अभिनय क्षेत्राच्या जोडीला निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. फुलवंती हा तिचा निर्माती म्हणून असलेला पहिला चित्रपट ठरला. अर्थात या चित्रपटाला थिएटर आणि ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. पण या चित्रपटातील काही गोष्टी तिला क्लिअर करायच्या होत्या. फुलवंती चित्रपटात प्राजक्ताने मुख्य भूमिका साकारली होती. पण चित्रपटात केलेल्या डान्सला मी १०० टक्के नक्कीच देणार नाही असे ती म्हणते. ‘कारण कोट्यवधींचं कर्ज घेऊन मी नाचत होते’. प्राजक्ता माळीने या चित्रपटासाठी बरेचसे पैसे गुंतवले असे म्हटले गेले.
त्यावर ती म्हणते की, ” मी आधी हे क्लिअर करू इच्छिते की, पहिल्या शेड्युलमध्ये प्रोड्युसरकडून जे पैसे येत होते ते हप्त्यांमध्ये येत होते. पण एका पॉइंटला ते थांबले , हे शेड्युल थांबू नये म्हणून त्यात मी पैसे टाकत गेले. पण काही दिवसांनी ते पैसे ततानी मला परत केले. त्यामुळे माझ्याकडून फुलवंती चित्रपटाला एकही पैसा घेतला गेला नाही. एक अभिनेत्री म्हणून आणि एक्झिक्युटर म्हणून यात माझं जे कष्ट होतं ते मी दिलं, तेही पैसे न घेता….तीच माझी फी असं आपण म्हणायचं. “
या चित्रपटासंदर्भात प्राजक्ता माळीने पॅनोरमा स्टुडिओ सोबत एक कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. या कॉन्ट्रॅक्टबद्दलही तिने एक मोठा खुलासा केला आहे. “आता हे कॉन्ट्रॅक्ट संपलंय त्यामुळे आता हे सांगायला हरकत नाही. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं लिहिलं होतं की, हे करोड रुपये आम्ही प्राजक्ता माळीला देतोय. जर हा चित्रपट बंद पडला , काही अडचण आली, ऑक्टोबर २०२४ पर्यंत चित्रपट प्रदर्शित झाला नाही तर हे करोड रुपये प्राजक्ता माळी आम्हाला परत करतील, ते ही १८ % व्याजासाहित.”