मनोरंजन क्षेत्रांमध्ये पडद्यावर काम मिळवण्यासाठी पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत असतात याविषयी सतत काही ना काहीतरी कानावर येत असतं . कधी यामध्ये तथ्य असतं तर कधी नुसतेच अफवांचे फुगे असतात . पण अनेकदा काही कलाकार याविषयी खुलेआम बोलतात आणि मग पडद्यावर दिसणाऱ्या सगळ्या ग्लॅमरस गोष्टींवरचा पडदा फाटला जातो. अर्थात प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या वाईट गोष्टी, चांगले वाईट अनुभव येतच असतात.मनोरंजन क्षेत्रही त्याला अपवाद नाही. या क्षेत्रात ज्या प्रमाणे तुमच्या टॅलेंट वर तुम्ही काम मिळवू शकता त्याच प्रमाणे मनोरंजन क्षेत्रातील काही गॉड फादर यांची हांजी हांजी करावी लागते हे पडद्यामागचे सत्य जेव्हा त्याच क्षेत्रातील काही कलाकार उघड करतात तेव्हा मात्र सगळ्यांचं लक्ष तिकडे वेधले जातं. असाच अनुभव शेअर केला आहे अभिनेत्री मीनल बाळ हिने.

तिने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्रींना काम मिळवण्यासाठी कसं गोड गोड वागावं लागतं, प्रोजेक्ट शी संबंधित असलेल्यांची छान छान वागावं लागतं तेव्हा जाऊन कुठे सिनेमा मालिका किंवा वेबसीरीज मध्ये वर्णी लागते असं म्हणत मीनलने मनोरंजन क्षेत्रासह प्रेक्षकांनाही धक्का दिला आहे. मीनलने हे मत तिच्या फेसबूक पेजवर शेअर केला आहे . अर्थात तिला हा अनुभव आला आहे की नाही हे तिनं उघड केले नाही किंवा पोस्ट च्या शेवटी, हा मजकूर मी कुणालाही उद्देशून केलेला नाही किंवा याबाबत माझा काही आक्षेपही नाही असे लिहायला हि ती विसरली नाही. या पोस्टमध्ये मिनलने असे लिहिले आहे की, “प्रामाणिकपणे खूप मनापासून सिरीयरली काम करणं, विचार करून चांगलं काम करण्याची धडपड,संयम,श्रध्दा, मेहनतीचं फळ वगैरे सब झूट है. कोणाच्या तरी मागे मागे करा, करेक्ट लोकांच्या संपर्कात रहा,एखाद्या ग्रूपशी संलग्न रहा, दाखवण्या पुरते खूप गोड वागा आणि बास …झालं काम. मग काय कामा वर काम मिळत राहणार आणि मग वर वर काम केलं तरीही किंवा काम येत नसेल तरीही फरक पडणार नाही . तुमच्या डोक्यावर क्राऊन हा असणारच आणि मग त्याचाच रुबाब (attitude) करायचा. आहे की नाही वर जाण्याचा म्हणजे प्रसिद्ध होण्याचा मार्ग.

शू…..कोणाला सांगू नका हा , हा मार्ग मी तुम्हाला सांगितला ते… आपलं सिक्रेट.”मीनलने केलेल्या या पोस्टवर आलेल्या कमेंटमध्ये कोणी या प्रकाराला दुजोरा दिला आहे तर कोणी मीनल तू अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. तू उत्कृष्ट कलाकार आहेस त्यामुळे तुला चांगल्या मार्गानेच काम मिळेल असा सल्लाही दिला आहे. तर अनेकांनी मनोरंजन क्षेत्रातील या चुकीच्या गोष्टींचा निषेधही केला आहे .आज-काल समाजामधल्या वेगवेगळ्या अयोग्य गोष्टींवर कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करत असतात. पण मीनलने ती काम करत असलेल्या मनोरंजक क्षेत्रातीलच धक्कादायक गोष्ट सोशल मीडिया सारख्या माध्यमातून जाहीरपणे सांगितल्यामुळे सध्या मीनल आणि तिच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे. मीनलने आज पर्यंत अनेक मराठी सिनेमा तसेच हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. भेटली तू पुन्हा, इरादा पक्का यासारख्या सिनेमात मीनल चा अभिनय पाहायला मिळाला. सध्या मीनल चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे.