काय घडलं त्या रात्री मालिकेत रेवती बोरकर ची भूमिका साकारली आहे अभिनेत्री मानसी साळवी हिने. मराठी चित्रपटातून प्रमुख नायिका ते हिंदी मालिकांमधील नायिका, सहनायिका अशा कित्येक भूमिका तिने आपल्या अभिनयातून चांगल्याच रंगवलेल्या पाहायला मिळाल्या. हिंदी मालिका सृष्टीत तग धरून असलेली मानसी तब्बल तेरा वर्षानंतर पुन्हा एकदा मराठी सृष्टीकडे वळलेली दिसली. आज मदर्स डे चे औचित्य साधून तिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही गोष्टी जाणून घेऊयात…

अभिनेत्री मानसी साळवी हिच्या करिअरची सुरुवात जाहिरात क्षेत्रापासून झाली होती. कहां से कहां तक, कोई अपना सा, पवित्र रिश्ता, सपने सुहाने लडकपन के, प्यार का दर्द है मीठा मीठा यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. हिंदी मालिकांमधून आपली ओळख निर्माण करत असताना आईशप्पथ, खेळ मांडला, असा मी अशी ती, नुपूर, असंभव या चित्रपट, मालिकेच्या माध्यमातून ती मराठी सृष्टीतही प्रेक्षकांसमोर आली. सती, सत्य की शक्ती या हिंदी मालिकेत काम करत असताना दिग्दर्शक असलेल्या हेमंत प्रभू सोबत मानसीचे प्रेम जुळून आले. २००५ साली तिने हेमंतशी प्रेमविवाह केला. काही वर्षे संसार सुखाचा सुरू असताना दोघांमध्ये मतभेद वाढू लागले आणि ११ वर्षांचा त्यांचा सुखी संसार अखेर मोडीत निघाला. मधल्या काळात त्यांनी एकमेकांशी जुळवून घ्यायचा खूप प्रयत्न देखील केला. पण २०१६ साली दोघांच्या संगनमताने त्यांनी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला यावेळी त्यांची मुलगी ओमिषा ही केवळ आठ वर्षांची होती. मुलगी लहान असल्याने तिने आपल्या मुलीची जबाबदारी सांभाळण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. सुरुवातीला तिच्या पालनपोषणाच्या जबाबदरीमुळे परगावी असलेल्या शूटिंगला नकार द्यावा लागला यात अनेक चांगले प्रोजेक्ट तिच्या हातून निसटले मात्र मुलीला प्राथमिकता देणाऱ्या मानसीने याचा फारसा विचार कधी केलाच नाही.

मुलगी लहान असल्याने सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी समोर आल्या त्यावर खंबीरपणे मात करून आईचे कर्तव्य तिने अगोदर बजावले. काय घडलं त्या रात्री या मालिकनिमित्त एका मुलाखतीत मानसीने आपल्या लेकीबद्दल सांगितले होते की, ‘ आता मुलगी मोठी झाली आहे… तिला चांगलं समजायला लागलंय त्यामुळे कधी कुठे बाहेरगावी दौरा निघालाच तर ती मला बिनधास्तपणे जाण्यास परवानगी देते “.. सध्या काय घडलं त्या रात्री या मालिकेत मानसी रेवती बोरकरचे पात्र साकारत आहे या भूमिकेबाबत सुरुवातीला खूप दडपण होत असं ती म्हणते आपलं चालणं, बोलणं व्यवस्थित होतंय की नाही आपली पोलिसी भूमिका प्रेक्षकांना कितपत आवडेल अशी पुसटशी शंका तिच्या मनामध्ये होती. मात्र तिची ही शंका तिच्या अभिनयाने साफ पुसून काढून प्रेक्षकांनीही तिला या भूमिकेत स्वीकारलेले पाहायला मिळाले. काहीच भाग शिल्लक राहिलेल्या या मालिकेचे चित्रीकरण सध्या थांबले असले तरी लवकरच त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु सध्या घरीच वेळ घालवत असलेले कलाकार आज मदर्स डे निमित्त चर्चेत येत आहेत मानसीनेही आज आपली आई आणि लेकिसोबतचा एक फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. एक सिंगल मदर असूनही आपल्या लेकीची चोख जबाबदारी सांभाळणाऱ्या मानसी साळवीलाही मदर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!!…