तरूणांची क्रश असलेल्या अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचं तीन दिवसांपूर्वी प्रियकर प्रतीक शाह याच्याशी लग्न झालं. प्रचंड गाजावाजा करून हृता आणि प्रतीक यांनी साखरपुडा केला होता , मात्र लग्नाची तारीख दोघांनीही सिक्रेट ठेवत अचानक लग्नाचे फोटो व्हायरल केले. हृताच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. पिवळ्या रंगाच्या साडीतील हृता आणि मोती रंगाच्या शेरवानीत प्रतीक खूपच छान दिसत होते. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाचा दुबई दौरा आटपून ह्रता थेट लग्नाच्या बोहल्यावरच चढली. आणि आता लेटस गो प्रतीक असं म्हणत हृता लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी बॅग भरून घराबाहेरही पडली. थांबा, गैरसमज करून घेऊन घेऊ नका. हृता आणि प्रतीक हनिमूनसाठी विमानाने रवाना झाले आहेत, त्यासाठीच ती बॅग भरून एअरपोर्टलुकमध्ये विमानतळावर प्रतीकसह दिसली.

सोशल मीडियावर तुफान फेमस असलेला चेहरा, लाखो तरूणांची ड्रीम गर्ल, दुर्वा मालिकेतील महत्त्वाकांक्षी दुर्वा, मन उडू उडू झालं मालिकेतील समंजस दीपू, फुलपाखरू मालिकेतील अवखळ वेदेही, दादा एक गुड न्यूज आहे नाटकातील बंडखोर नमिता, अपंगत्वावर मात करणारी अनन्या अशा ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन अनेक भूमिका वठवणाऱ्या हृताचा मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर दोन मिलियन फॉलोअर्स असलेली पहिली मराठी अभिनेत्री ही तिच्या फॅनक्लबचीच पावती आहे. त्यामुळे हृता आणि प्रतीकच्या रिलेशनशीपवर शिक्कामोर्तब झाल्यापासूनच त्यांच्या लग्नाचे वेध लागले होते. डिसेंबर महिन्यात हृता आणि प्रतीकने मोठया थाटात साखरपुडा केला होता. त्यावेळी हृता तिच्या चाहत्यांकडून ट्रोल झाली होती. मराठी नवरा मिळाला नाही का अशी तिच्यावर टीका झाल्याने ती नाराज झाली होती. माझ्या आयुष्यातील इतकी चांगली बातमी मी चाहत्यांना दिली पण त्यांनी माझ्या निर्णयावरून मारलेले टोमणे योग्य नाहीत असं मत तिने व्यक्त केलं होतं. याच कारणामुळे हृता आणि प्रतीक यांनी त्यांच्या लग्नाबाबत जाहीर वाच्यता न करण्याचं ठरवलं होतं. हृता आणि प्रतीक यांच्या लग्नाला मराठी आणि हिंदी सिनेमा, मालिका विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. प्रतीक शाह हा हिंदी मालिकांचा दिग्दर्शक असल्याने हिंदी टीव्ही स्टार्सची या दोघांच्या लग्नात खास उपस्थिती होती. तर हृता सध्या काम करत असलेल्या मन उडू उडू झालं या मालिकेतील सर्व कलाकारांनी हृताच्या लग्नात खूप धमाल केली. लग्नमंडपातील हृताचा लुकही खूप व्हायरल झाला तसेच तिचे लग्नातील काही भावूक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

लग्नानंतर हृता आणि प्रतीक यांचे हनिमूनला जातानाचे फोटो समोर आले आहेत. सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असलेल्या हृताने तिच्या स्टोरीमध्ये फोटो शेअर करत प्रतीकला टॅग केलं आहे. या फोटोत हृताचा नववधूच्या रूपातील पण साधासा लुक चाहत्यांना भलताच आवडला आहे. मुंबई विमानतळावरचा हा फोटो असून यामध्ये हृता आणि प्रतीक बॅगा घेऊन व्हेकेशनला जात असल्याचं दिसत आहे. कॅज्युअल ड्रेसमध्ये असलेल्या हृताचा चष्म्यातील फिल्टर लुकही खास आहे. आता ही जोडी हनिमूनला कुठल्या डेस्टिनेशनला जाणार हे त्यांनी सांगितलेलं नाही. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या हृताकडून हनिमून डेस्टिनेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर होतीलच, पण तोपर्यंत तिच्या चाहत्यांना थोडी वाट पहावी लागणार आहे. हृताच्या हातात सध्या मन उडू उडू झालं ही मालिका आणि दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक आहे. यामधून वेळ काढून तिने हनिमूनचा प्लॅन केला आहे. तर प्रतीकही सध्या एका हिंदी मालिकेचं दिग्दर्शन करत आहे. मन उडू उडू झालं या मालिकेत सध्याच्या ट्रॅकमध्ये हृताचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. ती हनिमूनवरून परत येईपर्यंत हृताचे मालिकेतील सीन कमी असणं आवश्यक असल्यानेच तिच्या अपघाताचा ट्रॅक आणला असण्याची शक्यता आहे. तर येत्या सप्टेंबरमध्ये हृताचा अनन्या हा पहिला सिनेमाही पडदयावर येणार आहे.