मराठी सृष्टीत बरेचसे कलाकार आहेत जे सुरुवातीला रेडिओ जॉकी म्हणून काम करत होते. त्यात अभिजित खांडकेकर हे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. रेडिओ जॉकी म्हणून काम करत असताना कला क्षेत्रातील मंडळींशी ओळख झाल्यावर अभिजीतला मालिका चित्रपटातून अभिनयाची संधी मिळाली. अशीच एक छानशी संधी आता मराठी सृष्टीतील अभिनेत्रीला मिळालेली आहे. फक्त फरक एवढाच आहे की तिने अगोदर अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावले इथे भरभरून यश मिळाल्यानंतर तिने आता रेडिओ जॉकी बनण्याचा सुखद अनुभव घेतलेला दिसून येत आहे.

मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या अमृता देशमुख हिने आता रेडिओ जॉकी म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. स्वीटी सातारकर, फ्रेशर्स, आज्जी आणि नात, मी तुझीच रे, एक कुटुंब तीन मिनार, देवाशप्पथ, कलाकार, बाबुरावला पकडा या चित्रपट आणि मालिकांमधून अमृता देशमुखने आजवर अनेक महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. झी युवा वरील फ्रेशर्स या मालिकेत तिने साकारलेली परीची भूमिका लोकप्रियता मिळवून गेली होती. अभिनयासोबतच डान्सची आवड देखील तिने जोपासली आहे. मालिका, चित्रपट असा अनुभव घेत असतानाच अमृताने नुकताच एक स्टँडअप ऍक्ट केला होता. यात आता आणखी एक पाऊल पुढे जात अमृता रेडिओ जॉकी बनून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 98.3 मिर्चीमराठी एफएम वर सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अमृताचा ‘टॉकरवाडी’ हा शो प्रसारित केला जात आहे.’उठा उठा सकाळ झाली अमृताच्या मॉर्निंग शो ची वेळ झाली, मी अमृता देशमुख मिर्ची ची ब्रँड न्यू होस्ट, मला आतापर्यंत तुम्ही फ्रेशर्स मधली परी किंवा स्वीटी सातारकरमधली स्वीटी म्हणून पाहिलं असेल पण एक सांगू का खऱ्या आयुष्यात ना मी कुणाची परी आहे ना मला स्वीटी म्हणावं एवढी मी स्वीट आहे मला वाटतं मी जरा नमकीन आहे अगदी बाकरवडी सारखी आणि म्हणूनच माझं नाव आहे टॉकरवाडी …’

असे म्हणत अमृता आता सोमवार ते शनिवार सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत रेडिओजॉकी बनून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. त्यामुळे अमृतासाठी हा एक नवा तितकाच खास अनुभव आहे. अमृता देशमुख ही आई कुठे काय करते या मालिकेतील यश म्हणजेच अभिषेक देशमुख ची सख्खी बहीण आहे . हे दोघे बहिणभाऊ सोशल मीडियावर बहुतेकदा एकमेकांसोबतचे धमाल मस्ती करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. मालिकेतला यश जितका खट्याळ आहे अभिषेक देखील खऱ्या आयुष्यात तितकाच खट्याळ आहे. त्याचेच अनुकरण करत त्याची बहीण शोभावी असाच स्वभाव अमृताचा देखील आहे. अमृताने आता रेडिओ जॉकी बनून आगळ्या वेगळ्या क्षेत्रात येण्याचे धाडस दाखवले आहे. तिच्या टॉकरवाडी या शोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतोसद मिळत असल्याने ती ही जबाबदारी अगदी चोख बजावत असल्याचे दिसून येते. या नव्या माध्यमातून अमृताला अमाप प्रसिद्धी मिळो हीच सदिच्छा…