सोनाली कुलकर्णी हिने गेल्या वर्षी कुणाल बेनोडेकर सोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र या लग्नाला त्यांचे कुटुंबीय उपस्थित नव्हते. याशिवाय लग्नाची कुठलीच हौसमौज करता न आल्याने सोनालीने आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी मोठ्या थाटात लग्न करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्यांदा पार पडलेल्या लग्नात सोनालीने मेहेंदी, हळद आणि संगीत सोहळा साजरा केला. लंडन येथे पार पडलेल्या तिच्या लग्नाला प्रार्थना बेहरेसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र लग्नसोहळ्यातील फोटो तिने सोशल मीडियावर प्रसिद्ध करणे टाळलं. अर्थात लग्न कसं झालं?, कुठे झालं? या सर्व प्रश्नांची उत्तरं ती योग्य वेळ आल्यावर सगळ्यांना सांगणार आहेच.

मात्र सोनाली पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने लग्नाच्या वाढदिवसाच्याच दिवशी पुन्हा लग्नाचा घाट घातलेला पाहायला मिळाला. ही अभिनेत्री आहे अक्षया गुरव. अक्षया गुरव ही मॉडेल तसेच मराठी मालिका अभिनेत्री आहे. मेंदीच्या पानावर या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. अक्षयाचे वडील पोलीस क्षेत्रात कार्यरत आहेत. कार्पोरेट क्षेत्रात करिअर करायचं म्हणून तिने मॅनेजमेंटचा अभ्यास केला. मात्र मॉडेलिंगसाठी ऑफर येऊ लागल्याने तिने हा पर्याय निवडण्याचे ठरवले. इथूनच तिला मालिकेत झळकण्याची नामी संधी मिळाली.मानसीचा चित्रकार तो, राधा प्रेम रंगी रंगली अशा मालिकेतून झळकल्यानंतर अक्षयाने फेकम फाक, बिटरस्वीट , रिवणावायली सारख्या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारल्या. मे २०१७ साली भूषण वाणी सोबत अक्षयाने लग्नगाठ बांधली. अक्षया आणि भूषणची एका कॉमन फ्रेंडने भेट घडवून आणली होती. पहिल्याच भेटीत अक्षयाला भूषण आवडू लागला. भूषणचा समजूतदारपणा, केअरिंग स्वभाव आणि तिच्या प्रति असलेलं प्रेम पाहून अक्षया भारावून गेली होती.

या भेटीनंतर हे दोघे आणखी काही दिवस एकमेकांना डेट करू लागले आणि अवघ्या काही महिन्यातच या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच अक्षया आणि भूषणचा लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करण्यात आला मात्र यावेळी त्यांनी हा लग्नाचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. हातावर मेहेंदी सजवून अक्षयाने हा क्षण अनोख्या पध्दतिने साजरा करून दुसऱ्यांदा लग्न केले. काही मोजक्या मित्रमंडळींना आमंत्रित करून त्यांनी हा वाढदिवस केक कापून आणि गळ्यात हार घालून साजरा केला. आपल्या सेकंड हनिमूनला हे दोघेही काही दिवसापूर्वीच यूएसला रवाना झाले आहेत. अक्षया गुरव आणि भूषण वाणी या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!.