गेल्या ३ वर्षांहून अधिक काळापासून इट सच या नावाने असलेल्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून सुमित चव्हाण याने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. त्याच्यासोबत भाग्या नायर हिने देखील अभिनय साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. फेक रे न्यूज, ही चाळ तुरु तुरु, छोटी खोटी लव्ह स्टोरी अशा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुमित चव्हाणने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावरील त्याच्या छोट्या लव्हस्टोऱ्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो. अभिनयासोबतच सुमित लेखक आणि दिग्दर्शकाची देखील भूमिका साकारतो. अशातच त्याला हे कंटेंट क्रिएट करण्यासाठी वेगवेगळ्या कलाकारांची देखील साथ मिळते.

आयुष्याच्या या यशस्वी वाटचालीत काही ना काहीतरी दुःखद बातमी प्रत्येकाच्याच वाट्याला येते. नुकतेच सुमितच्या वडिलांचे निधन झाले आहे. वडिलांच्या आठवणीत सुमित खूपच भावुक झाला आहे. त्यांच्या गोड आठवणी जाग्या करत सुमितने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो की, बाप माणुस गेला.. दुखापासून खूप लांब, आनंदात लपून बसलो होतो, अचानक दुःख येतं आणि तुम्हाला धप्पा देतं, तुम्ही Out होता. 2001 मध्ये बाबांची मिल बंद झाली, मुलाचं शिक्षण मुंबईतच झालं पाहिजे, म्हणून ते मुंबईत थांबले, रिक्षा चालवुन आमचं शिक्षण पूर्ण केलं. शाळा, कॉलेज आणि परवा पर्यंत शूट साठी मला त्याच रिक्षातून सोडत होते , त्यांची सगळी स्वप्न करत होतो, पण काही स्वप्न राहून गेली, गेले 21 वर्ष रिक्षा चालवली, आपल्या स्वतःच्या कार मध्ये बसून फिरवायच होतं, गावाला मोठा बंगला बांधायचा होता, बहिणीचं लग्न करून दयायचं होतं, मला मोठया पडदयावर बघायचं होत. पण मी हे सगळं नाही करू शकलो पूर्ण,मला उशीर झाला,आयुष्यभर ह्या गोष्टी मनाला टोचत राहतील. काय पण साला नशीब आहे.

ज्या दिवशी मी Film Industry मध्ये Entry घेतली , त्याच दिवशी बाबांनी Exit घेतली, एवढी वर्ष रिक्षा चालवली, आणि रिक्षातच आईच्या कुशीत जीव सोडला. बाबा तुम्ही आता star झालात, वरून बघत रहा, मी सगळी स्वप्न पूर्ण करेन, काळजी नका करू. ते कट्टर शिवसैनिक होते, त्यांना आपल्या आजूबाजूला गर्दी करायला आवडत होती, रात्री अचानक गेले तरी त्याच्यासाठी गर्दी झाली, ही त्यांनी कमावलेली माणसं होती. मी खूप प्रेम करतो तुमच्यावर.. हे एकदा तुम्हाला बोलायचं होत, बाबा आपण पुन्हा भेटू , गप्पा मारू, तो पर्यंत आईची बहिणीची मी काळजी घेईन, राहिलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याची ताकत मला माझ्या जवळच्या मित्रांनी दिलीय. तुम्ही खूप धावपळ केली आता आराम करा. असे म्हणत अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या सुमित याने आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.