
झी मराठी वाहिनीवर ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेत हार्दिक जोशी आणि अमृता पवार हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत तर बरेचसे नवे कलाकार या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आले आहेत. देशमुख कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहत असल्याने त्यात होणाऱ्या गमतीजमती मालिकेतून पाहायला मिळत आहेत. अदिती आणि सिध्दार्थचे लग्न जुळवण्यासाठी देशमुख कुटुंब गुळपोळीहुन अदितीच्या मुंबईत असलेल्या घरी दाखल झालं आहे मात्र अदितीच्या आईच्या कारस्थानामुळे सिद्धार्थच्या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ह्या त्रासातून अदिती त्यांची सुटका कशी करते आणि त्यांचा साखरपुडा कसा संपन्न होतो हे येत्या काही भागात पाहायला मिळेल. मात्र लवकरच या मालिकेत अदिती आणि सिध्दार्थच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. ही व्यक्ती कोण असेल? असा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना देखील पडला आहे. रविवारी २१ नोव्हेंबर राजी या मालिकेचा दुपारी २ वाजता आणि रात्री ९ वाजता १ तासाचा विशेष भाग प्रसारित होत आहे. या विशेष भागात अदिती आणि सिद्धार्थ चा साखरपुडा पार पडणार आहे त्याचवेळी बाईकवरून आलेली व्यक्ती अदीतीसाठी अंगठी घरून येते. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे “शुभम पाटील”. शुभम पाटील या मालिकेत दाखल होत असल्याने मालिकेला नवा ट्विस्ट आला आहे. शुभम पाटील हा कोण आहे ते जाणून घेऊयात.. अभिनेता शुभम पाटील हा मूळचा सांगलीचा. शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथून त्याने शिक्षण घेतले आहे तसेच तो सिव्हिल इंजिनिअर आहे. शुभमला अभिनयाची आणि फिटनेसची आवड आहे. काही व्यावसायिक जाहिरातीतून तो वेगवेगळ्या भूमिकेत झळकला आहे. याशिवाय क्राईम पेट्रोल सारख्या हिंदी मालिकांमधून त्याने छोट्या छोट्या भूमिका निभावल्या आहेत. ‘बिबट्या’ हा त्याने अभिनित केलेला आगामी मराठी चित्रपट आहे.

बिबट्या या चित्रपटाचे पोस्टर लॉंच झाले त्यावेळी या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. चित्रपटात शुभम पाटील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे तर विजय पाटकर, महेश कोकाटे, अनंत जोग, प्रमोद पवार, डॉ विलास उजवणे, अशोक कुलकर्णी, मनश्री पाठक, सचिन गवळी, सोमनाथ तडवळकर, सुभोद पवार, चैत्राली डोंगरे, सुशांत मांडले आदी कलाकार आहेत. हे पोस्टर पाहून लोकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या चित्रपटाची कथा चंद्रशेखर सांडवे यांची आहे तर पटकथा चंद्रशेखर सांडवे व आर. मौजे यांची असून या चित्रपटाचे संवाद कमलेश खंडाळे यांनी लिहले आहेत. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतून शुभम पाटील पहिल्यांदाच मराठी मालिका सृष्टीत झळकणार आहे. मालिकेतील त्याची भूमिका छोटीशी जरी असली तरी ती तितकीच उठावदार असणार आहे कारण अदीतीचे सिध्दार्थसोबत लग्न होऊन नये म्हणून तिची आई आटोकाट प्रयत्न करत आहे. मालिकेतला हा नवा ट्विस्ट देखील तिच्याचमुळे आला असणार अशी खात्री प्रेक्षकांना आहे. येणारा नवा ट्विस्ट काय असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षकही तितकेच उत्सुक आहेत.