दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनित ‘पुष्पा द राईज’ या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशात या चित्रपटामध्ये आता आपल्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा देखील मोलाचा वाटा असल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘पुष्पा द राईज’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अशात नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच चंदनाच्या झाडांचे घनदाट जंगल आणि त्यांची होत असलेली तस्करी दिसत आहे.

त्यानंतर अल्लू अर्जुनची एन्ट्री मोठी ॲक्शन सीनमध्ये होताना दिसते. ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुनचे डायलॉग श्रेयसच्या आवाजात ऐकू येत आहेत. श्रेयसने देखील स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ट्रेलरचा व्हिडिओ शेअर करत या विषयीची माहिती दिली आहे. त्याने व्हिडिओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “भारतातील सर्वात ताकदवान आणि स्टायलिश अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हिंदीमध्ये आवाज असल्याचा मला खूप आनंद आणि सन्मान वाटतो.लायन किंग नंतरचा हा माझा दुसरा हिंदी डब आहे पण तेलुगु फीचर फिल्मसाठी माझा पहिलाच डब आहे. अल्लू अर्जुनच्या अभूतपूर्व मेहनतीला न्याय देण्याचा माझ्या स्वत:च्या छोट्या मार्गाने प्रयत्न केला आहे. आशा आहे की तुम्हाला ते आवडेल. कृपया चित्रपट पहा आणि तुम्हाला तो कसा वाटला ते मला कळवा.” या चित्रपटात श्रेयसचा आवाज आहे हे कळताच त्याचे चाहते देखील मोठा आनंद व्यक्त करत आहेत. अनेकांनी त्याला कमेंटमध्ये अभिनंदन आणि शुभेच्छांसह हार्ट आणि फायर ईमोजी पाठवले आहेत. तसेच श्रेयस देखील चित्रपटासाठी आता खूप उत्सुक असल्याचे दिसते.

श्रेयसने आजवर बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतील छोटा आणि मोठा पडदा चांगलाच गाजवला आहे. त्याच्या दमदार अभिनयाने त्याने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनय आणि दिग्दर्शनसह त्याने आता आपला मोर्चा व्हॉईस डबिंग आर्टिस्टकडे देखील वळवला आहे. गोलमाल ३, हाउसफुल २ बॉलिवूडमधील या चित्रपटांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका अनेकांच्या फेवरेट आहेत. ‘पुष्पा द राईज’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा एक सुपर ऍक्शन, थ्रिलर आणि रोमान्सने भरलेला चित्रपट आहे. चित्रपटात रश्मिका मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. तसेच संगीत देवी श्री प्रसाद यांचे आहे. झी वाहिनीवर सुरु असलेली माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत तो प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतोय. बऱ्याच वर्षांनी त्यांनी पुन्हा मराठी मालिकेत काम केले आहे. त्याच्या एन्ट्रीने हि मालिकादेखील खूप यशस्वी ठरत आहे. मराठमोळ्या श्रेयस तळपदेला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…