सोशलमीडियावर दर सेकंदाला अशी एक पोस्ट पडत असते की ज्यामध्ये राजकीय भाष्य केले जाते. सध्याच्या राजकारणावर मत मांडले जाते. अगदी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी कलाकारांपर्यंत राजकारणावर बोलण्याचा अधिकार सोशलमीडियावर वापरत असतात. सध्या राज्यात, देशात ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहे त्या सामान्य माणसांच्या समस्यांशी कुठेही जोडलेल्या नाहीत हे अनेकांचे म्हणणे आहे आणि त्यात कलाकारही मागे नाहीत. बरेचदा कलाकार राजकीय गोष्टी बोलतात आणि त्याचीच बातमी होते. आता यामध्ये एक संवेदनशील कलाकार संदीप पाठक यानेही राजकारणावर आपले मत मांडलं आहे.

एकाही नेत्याला सामान्य जनतेच्या समस्येबद्दल काहीही वाटत नाही असं म्हणत संदीपने केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. त्याच्या चाहत्यांनी अर्थातच त्याला सपोर्ट केला आहे. नाटक, मालिका, सिनेमा, एकपात्री प्रयोग अशा व्यासपीठावरून प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच नव्हे तर लिखाणातून लोकांच्या डोळयात अंजन घालणारी जी काही मोजकी कलाकार मंडळी आहे त्यांच्या पंक्तीत संदीप पाठक याचं नाव घेतलं जात. मुळात लेखक असल्याने कलाकाराच्या पलीकडेही तो एक सूज्ञ नागरीकही आहे. समाजातील चुकीच्या गोष्टींवर तो नेहमीच भाष्य करत असतो. त्यातही सध्याच्या राजकारणाची नौका भरकटलेली आहे या मतावर तो ठाम असल्याचं त्याच्या पोस्टमधून् दिसत आहे. टिवीटमध्ये संदीपने असं म्हटलं आहे की, सध्या सर्व राजकीय नेते हे आपापसात भांडत आहेत. एकमेकांवर आरोप करण्यातच त्यांची राजकीय कारकीर्द संपत आहे. एकाने आरोप करायचा आणि दुसऱ्याने प्रत्यारोप करायचा हे चित्र राजकारणात सुरू आहे. कोरोनानंतर जगरहाटी अजूनही मार्गावर आलेली नाही. महागाईचा आगडोंब उसळला आहे. इंधनाचे दर वाढले आहेत. वीजटंचाईने लोक त्रस्त आहेत. पाण्याचा साठा संपत आहे.

नागरिकांच्या या समस्यांमुळे त्यांचं जगणं अवघड होत असताना एकही नेता यावर चकार शब्द काढत नाही. लोकांच्या समस्यांबाबत एकाही नेत्याला सोयरसुतक नाही. संदीप पाठकच्या या टवीटमध्ये त्याने मांडलेलं मत त्याच्या चाहत्यांनाही पटलं आहे. वऱ्हाड निघालं लंडनला या एकपात्री नाटकाच्या प्रयोगासह अनेक नाटकं आणि सिनेमांतील भूमिकांमुळे संदीप पाठकने त्याचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्याच्या सोशलमीडियावरील पोस्टकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष असते. आजपर्यंत अनेक कलाकारांनी केलेल्या राजकीय पोस्ट केल्याने चर्चा झाल्या आहेत तसेच काहीवेळा या पोस्टचा परिणामही झाला आहे. हेमंत ढोमे, हेमांगी कवी, डॉ. अमोल कोल्हे, सुबोध भावे यांच्या राजकीय पोस्ट याआधी गाजल्या आहेत. आता संदीप पाठकची पोस्ट व्हायरल होत आहे.