गेल्या काही दिवसांत मराठी सिनेमांचा पडदा चांगलाच गाजत आहे. वेगळे विषय, वेगळी मांडणी यामुळे मराठी सिनेमांची जोरदार चर्चा आहे. मराठी सिनेमांना प्राइम टाइम मिळत नाही, थिएटरमध्ये पुरेसे शो मिळत नाहीत या चित्राला छेद देत हिंदीलाही टक्कर देत आज मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोटींची उड्डाणे घेत आहे. आता मराठी सिनेमांच्या बॉक्स ऑफीसवरच्या कमाईची चर्चा सुरू असताना धर्मवीर.. मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाचा उल्लेख होणार नाही हे तर शक्यच नाही. अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक हा सध्या धर्मवीर सिनेमातील शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या भूमिकेमुळे प्रसिध्दीच्या झोतात आला आहे.

सोशल मीडियावर तो सातत्याने या सिनेमाविषयी पोस्ट करत आहेच, पण नुकतीच त्याने शेअर केलेली पोस्ट खूपच व्हायरल होत आहे. मराठी सिनेमा मोठा होतोय असं म्ह्णत प्रसाद ओक याने लक्ष वेधून घेतलं आहे. प्रसाद हा नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतो. प्रसादच्या फोटोपेक्षाही त्याच्या कॅप्शन खूप बोलक्या असतात याचा अनुभव त्याचे चाहते कायमच घेत असतात. प्रसाद हा अभिनेता आणि दिग्दर्श्यक या दोन्ही प्रांतात सध्या यशस्वी कलाकृती देत आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या चंद्रमुखी या सिनेमानेही कोट्यवधींची कमाई केली आहे. तर अभिनेता म्हणून प्रसाद ओक याने धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिल्याच्या कमेंटने त्याचा इनबॉक्स भरून गेला आहे. लार्जर दॅन लाइफ याप्रमाणे धर्मवीर सिनेमाच्या प्रमोशनचाही खूप थाट करण्यात आला होता. मोठमोठे कटआउटस अनेक शहरांमध्ये लागले होते. ट्रेलर लाँच कार्यक्रमातही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची उपस्थिती होती. धर्मवीर सिनेमाच्या प्रमोशनपासून ते प्रदर्शनानंतर प्रेक्षकांच्या प्रतिसादाच्या वर्षावापर्यंत प्रसाद अनेक अपडेट त्याच्या सोशल मीडिया पेजवर देत असतो.

त्यामुळेच त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिेलेलं असतं. १३ मे रोजी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा प्रवीण तरडे दिग्दर्शित सिनेमा प्रदर्शित झाला. तिसऱ्या आठवड्यानंतरही हा सिनेमा हाउसफुल्ल आहे. याच निमित्ताने सध्या प्रसादने केलेली पोस्ट आणि त्यासोबत व्यक्त केलेली भावनिक कॅप्शन व्हायरल होत आहे. धर्मवीर सिनेमाचं भव्य कटआउट पोस्टर आणि त्या पोस्टरजवळ उभा असलेला प्रसाद ओक असा फोटो त्याने शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने असं लिहिलं आहे की, कलाकार हा त्याच्या व्यक्तीरेखेपेक्षा कधीच मोठा नसतो. तो छोटाच असतो. सिनेमाचा नायक म्ह्णजे ती व्यक्तीरेखा असते. आज मला प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं त्याचा प्रचंड अभिमान आहे. प्रसादच्या या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव होत आहे.