सध्याच्या काळात कलाकारांना दोन वेळच्या जेवणाची परवड होताना दिसत आहे त्यात तर लोककलावंत अजूनही आपले काम सुरू नसल्याने आणखीनच अडचणीत सापडलेले दिसतात. मग अशा परिस्थितीत केवळ एकाच क्षेत्रावर विसंबून न राहता वेगवेगळ्या पर्यायी मार्गाने नोकरी किंवा व्यवसाय करून गुजराण करणे गरजेचे असते. तशा विचाराने अनेक कलाकारांनी मधल्या काळात विविध पर्यायी मार्गांचा अवलंब स्वीकारला आहे. कोणी वडापाव विक्री व्यवसायात गुंतले तर कोणी भाजीपाला विकतो आहे तर कोणी खानावळ, नाश्ता सेंटर चालवून पैसे कमवू लागले आहेत.

परंतु खूप आधीच मराठी सृष्टीतील एका अभिनेत्याने अशा पर्यायी मार्गाचा अवलंब स्वीकारलेला पाहायला मिळतो आहे. हा अभिनेता गेल्या कित्येक वर्षांपासून शेती करत आहे आणि तेही सेंद्रिय पद्धतीने एवढेच नाही तर आता हा अभिनेता चक्क पाच जिल्ह्यात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग देखील करत आहे. जाणून घेऊयात याबाबत अधिक… शेती व्यवसाय करणारा हा अभिनेता आहे “ओमकार कर्वे”. हिमालयाची सावली, एक घर मंतरलेल, जयमल्हार, उचला रे उचला, स सासूचा या आणि अशा कित्येक मालिका, चित्रपट आणि नाटकांतून ओमकार कर्वे प्रेक्षकांसमोर आला आहे. फक्त मराठी वरील ‘साईबाबा श्रद्धा आणि सबुरी’ या मालिकेतून तो शिर्डीचे पोलीस पाटील दादा कोतेपाटलांची भूमिका साकारत आहे. अभिनयाव्यतिरिक्त ओमकार हा नाशिक येथे गेल्या कित्येक वर्षांपासून सेंद्रिय शेती करत आहे. नाशिक येथे तीन एकर शेतीतून तो सेंद्रिय भाजीपाला, धान्याचे पीक घेत आहे शिवाय त्यांच्यावर प्रक्रिया करून ‘अॅग्री कोला’ या ब्रॅण्डखाली सेंद्रिय गुळ, देशी गाईचं तूप, हळद पावडर, उपवासाची भाजणी, थालीपीठ भाजणी, ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, डाळीचे पीठ अशी विविध उत्पादन तयार करून होईल तशी विक्री करत आहे.

नाशिक व्यक्तिरिक्त सातारा, नगर, औरंगाबाद, अमरावती, सांगली अशा पाच ते सहा जिल्ह्यात तो कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेती देखील करत आहे. यातून तूर डाळ, खपली गहू, ज्वारी, बाजरी , काळी मिरी, हापूस आंबा , भाजीपाला अशी विविध पिके सेंद्रिय पद्धतीने घेत आहे. कलाक्षेत्रातील मित्रमंडळींकडून त्याच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शेवटी शेती या क्षेत्रात विश्वास हा देखील तितकाच महत्वाचा असतो . ऑर्डरनुसार ग्राहकांपर्यंत आपला माल तत्परतेने पोहोचवणे हे फार महत्वाचे असते… त्यामुळे खात्रीशीर मालाची पोहोच त्याला वेळोवेळी ग्राहकांकडून मिळालेली असतेच शिवाय अनेकांकडून त्याच्या मालाचे कौतुकही केलेले पाहायला मिळते. ग्लॅमरस दुनियेपासून थोडं बाजूला जाऊन शेतीत रमणे ओमकारला जास्त आवडते. शूटिंगमधून जसा वेळ मिळेल तसा तो आपल्या शेताकडे जातो. ओमकारप्रमाणेच आता मराठी सृष्टीतील बरेचसे कलाकार एक विरंगुळा म्हणून शेती करताना दिसतात. अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी यांच्या ‘आनंदाचं शेत’ ची प्रसिद्धी देखील विविध माध्यमातून झालेली दिसली. सेंद्रिय शेती करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण करून देणाऱ्या ह्या कलाकारांमध्ये भविष्यात वाढ झाल्यास वावगे ठरायला नको.