प्रसिद्ध मराठी अभिनेता भारत जाधव यांच्या नावाचा वापर करून सिनेमात काम देतो म्हणून ऑडिशन घेत आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतकंच नाही तर ऑडिशन घेऊन त्या ऑडिशनमध्ये तुमचं सिलेक्शन झालं असून फोटोशूटसाठी काही रक्कम देखील नवोदित कलाकारांकडून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. अभिनेते भारत जाधव ह्यांनी नुकतंच हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. सोशिअल मीडियावर आपला एक फोटो शेअर करत त्यांनी हि बातमी दिली आहे.

अभिनेता भारत जाधव ह्यांनी काल हि बातमी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केली आहे त्यात ते म्हणतात “काल एका व्यक्ती चा मेसेज आला की “तुमच्या सिनेमात काम करण्यासाठी मुंबईतील एका एजंटने आमची ऑडिशन घेतली व सिलेक्शन झाले असून फोटोशूट व पुढील प्रोसेसिंग फी च्या नावाखाली १५०००/- रुपयांची मागणी केली.” मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या कोणत्याही सिनेमाचं असं कुठेही ऑडिशन सुरू नाहीए. जर कोणी माझ्या नावाचा गैरवापर करून किंवा माझ्या सोबतचा एखादा फोटो दाखवून सिनेमात काम मिळवून देतो असे आश्वासन देत असेल तर अशा भूलथापांना बळी पडू नका. कोणालाही पैसे देऊ नका. संबंधित व्यक्तींवर लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई होईल.” ह्या पूर्वी देखील असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत त्यामुळे नवोदित कलाकारांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. आपला वेळ आणि पैसा ह्या महामारीच्या काळात योग्य ठिकाणी आणि कमीत कमी खर्च करावा शिवाय अश्या जाहिराती पाहायला मिळत असतील तर त्याची शहानिशा करण तितकंच गरजेचं आहे असं ते सांगतात.