मी का ऑडिशन द्यायच्या? गेल्या ३६ वर्षांपासून १३ कोटी जनतेनं… या कारणामुळे हिंदी चित्रपटासाठी अशोक शिंदे यांनी दिला नकार
हिंदी चित्रपटात काम मिळवण्यासाठी अनेक मराठी कलाकारांची धडपड सुरू असते. पण मराठी सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अशोक शिंदे यांनी या बॉलिवूडला स्पष्टपणे नकार दिलेला पाहायला मिळतो. डिसेंबर महिन्यात रिलीज होणाऱ्या विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या छावा चित्रपटात अशोक शिंदे यांना एक भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. पण ही भूमिका करण्यास अशोक शिंदे यांनी स्पष्ट नकार दिला.
याबद्दल ते म्हणतात की, ” मला बॉलिवूड सृष्टीतील मोठमोठ्या प्रोड्युसरकडून ऑफर आल्या. आमच्या चित्रपटात काम करा उद्या अशी अशी ऑडिशन आहे असे ते मला रोज फोन करतात. पण यासाठी मी ऑडिशन का द्यायची?. गेल्या ३६ वर्षांपासून मला मराठी इंडस्ट्रीत नाव मिळालं आहे. या १३ कोटी जनतेनं माझ्यावर भरभरून प्रेम केलं आहे. एक अभिनेता म्हणून त्यांनी मला स्वीकारलं आहे. मला एवढा कामाचा अनुभव असूनही जर मला ऑडिशन देण्यासाठी सांगत असतील तर मी ते का करू?. लक्ष्मण उतेकर यांनी छावा चित्रपटाच्या कास्टिंगसोबत माझा फोटो लावला होता. त्यांनी मला या चित्रपटात काम करशील का असं विचारलं. पण ही भूमिका जी होती ती छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती देणाऱ्या व्यक्तीची होती आणि राणी त्याला हत्तीच्या पायी देतात. मी आजपर्यंत सकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे त्यामुळे या नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलू शकतो. त्यामुळे मी त्यांना नाही म्हणालो. “
अशोक शिंदे पुढे असेही म्हणतात की, ” मराठी सृष्टीने मला प्रेम दिलं आहे. त्याच्या अशा चित्रपटातून मला काय मिळणार आहे. मला १३ कोटी जनता बघते, मी इथे नायक, खलनायक साकारला आहे.आजही मी टीव्हीच्या माध्यमातून जनतेसमोर आहे. मला हिंदी चित्रपटात अशा भूमिका करून काय मिळणार?. संधी मिळणार की काम?. अर्थात कामातूनच तुम्हाला पैसे मिळत असतात पण मराठीतही आता खूप पैसा आहे.”