काल शनिवारी ४ जून २०२२ रोजी अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. शिवाजी मंदिर येथे व्हॅक्युमक्लिनर या नाटकाचा प्रयोग झाला त्यावेळी त्यांचे नातेवाईक आणि उपस्थित सर्व कलाकारांच्या तसेच चाहत्यांच्या गर्दीत अशोक सराफ यांना औक्षण करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. निर्मिती सावंत, निवेदिता सराफ यांच्यासोबत अनेक कलाकार मंडळी या मंचावर उपस्थित होती. निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठी घोषणा केलेली पाहायला मिळाली. हि घोषणा नक्की काय आहे ते सविस्तर पाहुयात.

चाहत्यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा होत असताना अशोक सराफ यांचे ‘मी बहुरुपी’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे असे निवेदिता सराफ यांनी जाहीर केले आहे. ही घोषणा करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात पुस्तकाचे स्वागत केलेले पाहायला मिळाले. निवेदिता सराफ पुढे असेही म्हणाल्या की या पुस्तकाच्या विक्रीतून जो निधी गोळा होईल तो गरजू कलाकारांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. ज्या कलाकारांना हाताला काम नाही तसेच आजारपणामुळे ज्यांना व्याधी जडलेल्या आहेत अशा कलाकारांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला आहे. असा वाढदिवस कधी साजरा होईल याची त्यांनी कल्पना देखील केली नव्हती. त्यामुळे अशोक सराफ पुरते भारावून गेले होते. प्रेक्षकांमुळेच मी आहे यापुढेही माझ्यावर असेच प्रेम राहुद्या अशी एक विनंती त्यांनी चाहत्यांना केली. मी बहुरुपी हे अशोक सराफ यांचे पुस्तक प्रकाशित केले जात असल्याने या पुस्तकात चाहत्यांना नेमके काय वाचायला मिळणार याची अधिक उत्सुकता आहे.

अर्थात या पुस्तकातून त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला जाणार हे निश्चित आहे. जीवनातील अनेक चढ उतार या कलाकाराने अनुभवले आहेत त्यामुळे त्यांचा प्रवास जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटातूनही काम केले मात्र हिंदी चित्रपट सृष्टीत दुय्यम भूमिका मिळत असल्याने त्यांनी त्या सफशेल नाकारलेल्या पाहायला मिळाल्या. असेच काही खास किस्से या पुस्तकातून चाहत्यांना वाचायला मिळतील अशी अपेक्षा आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटातील त्यांच्या जीवनावर आणि चित्रपटावर आधारित माहित नसलेले अफलातून गमती जमती तुम्हाला ह्या पुस्तकाच्या माध्यमातून वाचायला मिळतील असं देखील निवेदिता जोशी सराफ म्हणाल्या. तूर्तास अशोक सराफ यांना ७५ व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!.