सोशल मीडिया हे असं मध्यम आहे जिथे चांगल्या वाईट अशा सर्वच गोष्टींना बारकाईने चघळले जाते. याचा फायदा अनेकांना झालाय तर कोणाला यामुळे नुकसान देखील सोसावे लागले आहे. असाच एक अनुभव सध्या मराठी अभिनेता अंशुमन विचारे आणि त्याची पत्नी पल्लवीने अनुभवलेला आहे. एका व्हिडिओमुळे या दोघांना गेल्या पाच दिवसांपासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अर्थात आपण लोकांना एप्रिल फुल केलं की लोकांनी आम्हाला एप्रिल फुल केलं हेच कळत नाही असे आता अंशुमनची पत्नी या नव्या व्हिडिओतून म्हणत आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.

एक एप्रिल रोजी एप्रिल फुल करावं म्हणून अंशुमनच्या पत्नीने एका बाळाचा व्हिडीओ शेअर केला होता. आणि अन्वीला भाऊ झाला असे कॅप्शन त्याला देण्यात आले होते. अंशुमनची मुलगी अन्वी ही सोशल मिडिया स्टार आहे तिचे अनेक मजेशीर व्हिडीओ तिच्या युट्युब चॅनलवर पाहायला मिळतात. लोकांनाही तिचे हे व्हिडिओ खूप आवडतात. त्यामुळे एक गंमत म्हणून पल्लवीने मुलगा झाला असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. एका दवाखान्यात पल्लवी ट्रीटमेंटसाठी जात असते तिथे नुकतेच जन्मलेले एक बाळ अन्वीला खूप आवडलं म्हणून तिने ते मांडीवर घेतलं. हाच व्हिडीओ बनवून पल्लवीने सोशल मीडियावर शेअर करून अन्वीच्या चाहत्यांना एप्रिल फुल करायचं ठरवलं. मात्र हा व्हिडीओ व्हायरल होताच अंशुमनला मुलगा झाला म्हणून सगळ्यांचे अभिनंदन करणारे मेसेजेस आणि फोन कॉल्स येऊ लागले. व्हिडीओ बाबत अंशुमनला कुठलीच कल्पना नव्हती मात्र एक पुसटशी कल्पना पल्लवीने अगोदर दिली होती. मात्र गेले चार दिवस झाले अंशुमनला सतत फोन येत असल्याने त्यांनी ही बाब समोर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

आता हा त्रास असह्य होत असल्याने पल्लवीने हे प्रकरण इथेच थांबवण्याची विनंती केली आहे. मी लोकांना एप्रिल फुल करायला गेले मात्र आमचेच एप्रिल फुल झाले हेच आता ती म्हणताना दिसत आहे. यासोबतच अन्वीचा तो व्हिडीओ नीट पाहण्याची विनंती तिने केली आहे जेणेकरून तुमचे सर्व गैरसमज दूर होतील. आम्हाला एकच मुलगी आहे अन्वीला भाऊ झालेला नाही. अंशुमन आणि मी आम्ही दोघांनी निर्णय घेतला होता की मुलगी असो किंवा मुलगा आम्हाला एकच अपत्य हवं होतं आणि अन्वी हीच आमची एकुलती एक मुलगी आहे. अंशुमन विचारे याने मराठी सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. वाकडी तिकडी या नाटकाच्या दौऱ्यामध्ये तो सध्या व्यस्त आहे मात्र मुलगा झाला म्हणून अभिनंदनाचे येणारे फोन कॉल्स त्याला नाहक त्रास देणारे ठरले आहेत. एप्रिल फुलचं हे प्रकरण आपल्याच अंगाशी आलं अशीच एक भावना आता पल्लवीने व्यक्त केली आहे.