मराठी सृष्टीत अनेक कलाकारांच्या घरी चिमुकल्यांचे आगमन झालेले पाहायला मिळते. मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकित मोहन आणि अभिनेत्री रुची सवर्ण हे देखील नुकतेच आईबाबा बनल्याचं सुख अनुभवताना दिसत आहेत. अंकित आणि रुची यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. अंकितने बाबा झाल्याचा एक गोड अनुभव देखील सांगितला आहे. रुची दोन दिवसांपूर्वी दवाखान्यात दाखल झाली होती तेव्हा नॉर्मल डिलिव्हरी व्हावी अशी अंकीतची अपेक्षा होती. मात्र काही कारणास्तव सिझेरियन करावे लागल्याने आता अंकित आपल्या बाळाची काळजी घेत आहे. बाळाला आपल्या हातात घेणं आणि त्याला आपल्या हातानं खाऊ घालणं, त्याचे नॅप्पी बदलणं हे सगळं तो स्वतः अनुभवत आहे.

आपल्या बाळाच्या भविष्याबाबत देखील तो म्हणतो की, माझा मुलगा आता हळूहळू रांगेल, चालू लागेल पुढे जाऊन तो माझा जिम पार्टनर देखील बनेल या विचारानेच अंकित खूपच खुश झालेला पाहायला मिळतो आहे. अंकित मोहन याने ‘फत्तेशीकस्त’, ‘फर्जंद’, ‘एक थी बेगम’, ‘महाभारत’, ‘शोभा सोमनाथ की’, ‘हैवान’, ‘ कुमकूम भाग्य’ या मालिका आणि चित्रपटातून अभिनय साकारला आहे. त्याच्या शरीर यष्टीमुळे मराठी चित्रपटातला बाहुबली अशीही ओळख त्याला मिळाली आहे. अंकितची पत्नी रुची सवर्ण ही देखील हिंदी मराठी मालिका अभिनेत्री आहे. ‘ सख्या रे’ या मराठी मालिकेतून तिने प्रियंवदा ची भूमिका साकारली होती. प्यार का बंधन, कुमकुम भाग्य, कुंडली भाग्य, घर आजा परदेसी अशा हिंदी मालिका तिने अभिनित केल्या आहेत. कुमकुम भाग्य सारख्या आणखी काही हिंदी मालिकेतून हे दोघेही एकत्रित झळकले होते. २०१५ साली रुची आणि अंकित मोहन विवाहबद्ध झाले होते. हिंदी मालिकेत झलकल्यानंतर या दोघांनी मराठी सृष्टीकडे आपली पावले वळवली. अंकित मोहन हा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहे. येत्या ३१ डिसेंबर रोजी पावनखिंड चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अंकीतचा आनंद आता आणखीनच द्विगुणित झालेला पाहायला मिळतो आहे.