अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने नोव्हेंबर २०२१ मध्ये तिचा पती आणि मराठी चित्रपट अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्या विरोधात शारीरिक आणि मानसिक छळ केल्या प्रकरणी अलंकार पोलीस चौकीत तक्रार दाखल केली होती. स्नेहा चव्हाण ही अनिकेत विश्वासराव याच्यासोबत २०१८ साली विवाहबद्ध झाली होती. मात्र लग्नानंतर डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०२१ या दरम्यान तिची शारीरिक आणि मानसिक छळवणूक केली असल्याचे तिने या तक्रारीत म्हटले होते. अनिकेत मला लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देतो, मारहाण, गळा दाबून जीवे मारण्याच्या धमक्या देतो शिवाय मी त्याच्यापेक्षा वरचढ ठरू नये म्हणूनही त्रास देतो असेही तिने या तक्रारीत म्हटले होते.

हे सर्व आरोप लावत असताना अनिकेतने काही काळ मौन बाळगले होते मात्र आपली अशी बदनामी होत असल्याचे पाहून त्यानेही मीडियाशी बोलून आपले मन मोकळे केले होते. मीडियाशी बोलताना त्याने म्हटले होते की, स्नेहा चव्हाण ५ फेब्रुवारी २०२१ पासून माझ्यासोबत राहत नव्हती . ५ फेब्रुवारी रोजीच ती घर सोडून माहेरी निघून गेली होती. जाताना तिने सोबत सोन्याचे दागिने देखील घेतले होते. तिलाच माझ्यापासून विभक्त व्हायचं होतं त्यामुळे तिने माझ्याकडे २५ लाखांची पोटगी देखील मागितली होती. मी ही पोटगी देण्यास तिला नकार दिला होता. शिवाय कायदेशीररित्या आपण कोर्टात जाऊन घटस्फोट घेऊ असं म्हटल्यावर स्नेहा आणि तिच्या कुटुंबीयांकडून मला धमक्या येऊ लागल्या. मी जर पैसे दिले नाहीत तर माझं नाव बदनाम केलं जाईल अशी धमकी मला मिळत होती, पण या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं. फेब्रुवारी महिन्यापासून स्नेहा माझ्यासोबत राहत नाही तिची जर छळवणूक होत होती तर हे सांगायला तिला १० महिने का लागतात?… आपल्यावर अत्याचार होतोय हे १० महिन्यांनी तिला जाणवलं का?.. माझ्या वडिलांच्या वाढदिवसाच्याच दिवशी तीने आमच्या विरोधात तक्रार का दाखल केली. माझ्या व माझ्या कुटुंबाचा आनंद तिला पहावला नाही. स्नेहा आणि तिचे कुटुंब आमच्या विरोधात हे षडयंत्र रचत आहेत आणि माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास देत आहेत….असे अनिकेत विश्वासरावकडून स्नेहाने लावलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण मिळाले होते.

त्यानंतर अनिकेत आता आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त असलेला पाहायला मिळाला. ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकात अनिकेत विश्वासराव याने निरंजन मुजुमदार हे मुख्य पात्र साकारले आहे. त्यामुळे येत्या काही काळात तो नाटकाच्या दौऱ्यावर असणार आहे. या नाटकाचे जवळपास २१० प्रयोग झाले आहेत. स्नेहा आणि माझ्या नात्याबद्दल मी आता तरी काही सांगणार नाही पण घटस्फोट निश्चितच घेणार आणि आणि त्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याचे त्याने सांगितले आहे. दहा दिवसांसाठी मी आगाऊ जामीन मिळवला आहे. जर कोणाला विभक्त व्हायचं असेल तर त्याने कायदेशीररित्या घटस्फोट घ्यावा जसा मी घेत आहे. ही प्रोसेस वेळखाऊ आहे आणि त्याला तेवढा वेळ देणे गरजेचे आहे. जशी मी देतोय माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि न्यायाच्याच बाजूने मी जाण्याचा निर्णय घेतला आहे असे स्पष्टीकरण अनिकेत विश्वासराव याने मुलाखतीत दिले आहे.