चंदेरी दुनियेला लग्न आणि घटस्फोट या बाबी काही नव्या नाहीत. आजही मराठी सृष्टीतील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आपल्या पतीपासून विभक्त होऊन एकट्या राहताना दिसत आहेत. हे जरी खरे असले तरी गेल्या काही महिन्यात घडलेल्या अभिनेत्यांच्या साखरपुडा आणि लग्नामुळे मराठी सृष्टीतील दोन अभिनेत्रीचा अचानकपणे संसार मोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील एक जोडी आहे अभिनेत्री “पूजा पुरंदरे आणि अभिनेता विजय आंदळकर” यांची.

अभिनेत्री पूजा पुरंदरे आणि विजय आंदळकर यांचा २०१७ साली विवाह संपन्न झाला होता मात्र काही दिवसांपूर्वीच अभिनेता विजय आंदळकर याने रुपाली झनकर हिच्यासोबत एप्रिल महिन्यात साखरपुडा केला. त्यांचा हा साखरपुडा प्रेक्षकांसाठी धक्का देणारा होता कारण विजय आंदळकरचे पहिले लग्न पुजा सोबत झाले होते हे कित्येकांना माहीत होते. विजय आंदळकर आणि रुपाली झनकर यांनी “लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू” या झी मराठीवरील मालिकेतून एकत्रित काम केल होतं. विजयने मदनची भूमिका तर रुपालीने या मालिकेतून मदनची पत्नी अर्थात काजलची भूमिका साकारली होती. या मालिकेचे शूटिंग नाशिक येथे पार पडले होते त्यामुळे मालिकेचे सर्वच कलाकार त्याच ठिकाणी राहत होते. या मालिकेत एकत्रित काम करत असतानाच रुपाली आणि विजय या दोघांमध्ये जवळीक वाढत गेली आणि आता या दोघांनी लवकरच लग्नही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विजय आणि पूजाचा घटस्फोट झाला असल्याचे समोर आले आहे. पूजा सध्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत काम करत आहे मात्र विजयच्या साखरपुड्यावर तिने मीडियाला अजूनही कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

प्रेक्षकांसाठी दुसरा एक धक्का म्हणजे अभिनेता “संग्राम समेळ आणि श्रद्धा फाटक” यांचे झालेले लग्न. कारण संग्रामचे हे दुसरे लग्न होते या अगोदर २०१६ साली त्याने अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्यासोबत लग्न केले होते. या वर्षी मार्च महिन्यात संग्राम नृत्यांगना असलेल्या श्रद्धा फाटक हिच्याशी विवाहबद्ध झाला. त्यामुळे पल्लवीशी त्याने घटस्फोट घेतल्याचे समोर आले. संग्राम हा एक उत्कृष्ट आणि नव्या दमाचा अभिनेता म्हणून सर्वोपरिचित आहे. त्याने साकारलेल्या भूमिका वेगळाच भाव खाऊन जातात त्यामुळे त्याचा अभिनय आणखीन फुलून येतो. अभिनेता संग्रामने या आधी पुढचं पाऊल, ललित २०५, कुसुम मनोहर लेले, स्वीटी सातारकर, विकी वेलींगकर या चित्रपट, मालिका तसेच नाटकांतून काम केले आहे तर पल्लवीने रुंजी मालिकेतून प्रमुख भूमिका साकारली होती. याशिवाय बापमाणुस, अग्निहोत्र २ यासारख्या मालिका तिने अभिनित केल्या होत्या. त्यामुळे अभिनेत्री पूजा पुरंदरे आणि पल्लवी पाटील यांचा मोडलेला हा संसार प्रेक्षकांसाठी नक्कीच मोठा धक्का देणारा ठरला आहे.