मराठी मालिका तसेच चित्रपट अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या आपल्या आगामी चित्रपटानिमित्त दौरे करताना दिसत आहे . दीपक राणे यांचा आगामी चित्रपट मराठी तसेच कन्नड भाषेवर आधारित आहे या चित्रपटाचे नाव त्यांनी अजून जाहीर केलेले नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात आले होते. मेघा शेट्टी, कविश शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके, शलाका पवार, अश्विनी चावरे असे बरेचसे कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. चित्रपटाच्या निमित्त शिवानी सुर्वे, विराट मडके आणि अश्विनी चावरे हे कलाकार शूटिंगसाठी रवाना झाले होते. मात्र या प्रवासात नुकताच एक धक्कादायक अनुभव शिवानी आणि तिच्या सहकलाकारांना आलेला पाहायला मिळाला आहे.

शिवानी सुर्वे तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग कर्नाटकात असल्या कारणाने बंगलोर ते मंगलोर हा विमानाने प्रवास करत होती. या विमान प्रवासात सर्वांना विचित्र आणि तितकाच भयानक अनुभव आलेला आहे. सुरुवातीला विमान उडण्यास सक्षम नसल्याचे जाणवू लागले त्यातून धडकी भरणारे विचित्र आवाज येऊ लागले मध्ये मध्ये धक्केही बसू लागले शिवाय लँडिंग होतानाही विमानाला एक जोरदार झटका बसला. हा सगळा अनुभव खूपच भीतीदायक होता असे ह्या कलाकारांनी सांगितले. विमानाने टेक ऑफ घेतले तेव्हाच सर्व प्रवाशांनी अक्षरशः जीव मुठीत घेऊन हा प्रवास केला होता. मात्र विमान लँडिंग होताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकलेला पाहायला मिळाला. सध्या ही कलाकार मंडळी शूटिंग निमित्त कर्नाटकात आहेत. प्रवासादरम्यान आपल्याला आलेला हा अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. देवयानी या मालिकेमुळे शिवानी सुर्वेला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. मालिका, चित्रपट असा प्रवास करताना मराठी बिग बॉसच्या २ ऱ्या सिजनमध्ये ती चर्चेत आली होती. आता लवकरच शिवानी दीपक राणे यांच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचे नाव अजून जाहीर झाले नसले तरी मराठी आणि कन्नड भाषेतील हा चित्रपट असल्याने याची उत्सुकता निर्माण झाली आहे.