प्रेक्षकांचे आवडते कलाकार त्यांना मालिका, सिनेमा, वेबसिरीजमधून पहायला मिळतातच, पण कलाकारांच्या पर्सनल गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियावर फॉलो करत असतात. सेलिब्रिटींच्या फॉलोअर्सवरून त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येते. सोशल मीडियावर कलाकार कधी रिल्स बनवून तर कधी व्यक्तीगत आयुष्यातील फोटो, व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी कनेक्ट राहत असतात. अभिनेता अजिंक्य राऊत हादेखील सोशल मीडियावर अक्टीव्ह होता. रिल्स, व्हिडिओ, मालिकेतील ऑफस्क्रिन धमाल शेअर करत त्याने चाहत्यांशी मनं जिंकली होती.

पण आता पुढचे काही दिवस अजिंक्य इन्स्टापेजवर भेटणार नाही. त्याने त्याचं इन्स्टा पेज बंद केल्याची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. अर्थातच त्याच्या चाहत्यांना ही गोष्ट रूचणारी नाही, पण कारणच असं घडलं आहे की अजिंक्यला इन्स्टा अकौंउंट बंद करण्यावाचून पर्याय उरलेला नाही. पण आता कलाकारांच्या सोशल मीडियावर हॅकर्सकडून विळखा घातला जात आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांचे इन्स्टा पेज हॅक झाले आहे. आता हा फटका मन उडू उडू झालं या मालिकेतील इंद्राची भूमिका करणारा अजिंक्य राऊत यालाही बसला आहे. अजिंक्यचं इन्स्टाग्राम अकौउंट हॅक झाल्याचं समोर आलं आहे. त्याच्या इन्स्टापेजवर हॅकर्सने ताबा मिळवला आहे. ही गोष्ट लक्षात येताच अजिंक्यने त्याचे पेज डिअक्टीव्ह केलं आहे.मनोरंजविश्वातील माहिती देणाऱ्या एक वेबसाइटने अजिंक्यचे इन्स्टा अकौउंट हॅक झाल्याचे सांगितलं आहे. अजिंक्य राऊतनेही याला दुजोरा दिला असून सध्या तरी त्याने हे पेज बंद केले आहे. मन उडू उडू झालं या मालिकेतील इंद्रजित साळगावकर या भूमिकेमुळे अजिंक्य घराघरात पोहोचला आहे.

या मालिकेत त्याची हृता दुर्गुळेसोबतची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या मालिकेतील दीपू आणि इंद्रा यांच्या केमिस्ट्रीवर प्रेक्षक फिदा आहेत. सध्या या मालिकेत इंद्रा आणि दीपूच्या प्रेमाचा ट्रॅक सुरू आहे. मालिकेतील ही जोडी सोशल मीडियावर अनेक रिल्स बनवून लक्ष वेधून घेत असते. अजिंक्यही त्याचे पर्सनल फोटो शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असतो. पण आता त्याचे इन्स्टा अकौंउट हॅक झाल्याने तो सोशल मीडियावरील इन्स्टापेजवर चाहत्यांना भेटणार नाही. सध्या तरी त्याने सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थांबण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्याने रितसर तक्रार दाखल केली आहे. आता सगळं सुरळीत होऊन प्रेक्षकांचा लाडका इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊत कधी इन्स्टावर परत येतोय याची चाहते वाट पाहत आहेत.