सध्या बऱ्याच कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळत आहे. यातच मराठमोळा गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांच्याही लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. राहुल वैद्य हा मराठमोळा गायक इंडियन आयडलच्या पहिल्या सिजनमधून प्रेक्षकांसमोर आला होता याच शोमुळे राहुल वैद्य हे नाव हिंदी आणि मराठी सृष्टीत ओळखलं जाऊ लागलं. राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या लग्नाचा सोहळा उद्या १६ जुलै रोजी मोठ्या थाटात पार पडणार आहे.

साधारण दोन दिवसांपासून मेहेंदी सोहळा आणि हळदीचा सोहळा पार पडत असून त्यांच्या लग्नाची ही धामधूम सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या दोघांनी अल्बममधून एकत्रित काम केले होते. त्यांची हीच ओळख उद्या लग्नामध्ये रूपांतरित होणार आहे. राहुल वैद्य हा मूळचा नागपूरचा , राहुलचे वडील कृष्णा वैद्य हे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डात इंजिनिअर आहेत. त्यामुळे मुंबईतच तो लहानाचा मोठा झाला. राहुलने मिठीबाई कॉलेजमधून आपले शिक्षण घेतले असून गाण्याची त्याला लहानपणापासूनच विशेष आवड होती. स्टार यार कलाकार, क्लोजप अंताक्षरी, चलती का नाम अंताक्षरी या शोमधून त्याने सहभाग दर्शवला होता. मात्र त्याच्या गायकीला खरा वाव मिळाला तो इंडियन आयडॉलच्या पहिल्याच सिजनमधून . या शोमध्ये राहुल सेकंड रनरअप ठरला होता. आभास हा…या मराठी गाण्यासोबतच अनेक हिंदी चित्रपटांची गाणी त्याने गायली आहेत. शिवाय स्वतःचे म्युजिक अल्बमही त्याने बनवली आहेत. याच अल्बममध्ये त्याची भेट दिशा परमारशी झाली. बोग बॉसच्या १४ व्या सिजनमध्ये घरात असताना त्याने टीव्ही माध्यमातून दिशाला प्रपोज देखील केले होते.

त्यावेळी राहुल आणि दिशा यांची प्रेमकहाणी चांगलीच चर्चेत येऊ लागली होती. दिशा परमार ही देखील हिंदी मालिका अभिनेत्री आहे. तिने २०१२ सालच्या प्यार का दर्द है मिठा मिठा प्यारा प्यारा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. याशिवाय झी टीव्ही च्या वो अपना सा या मालिकेतूनही तिने महत्वाची भूमिका साकारली होती. दोन दिवसांपूर्वी दिशाने बॅचलर पार्टी साजरी केली होती त्यानंतर मेहेंदी सोहळा आणि हळदीच्या सोहळ्याचे फोटो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेले पाहायला मिळत आहेत. उद्या १६ जुलै २०२१ रोजी राहुल आणि दिशा विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या आयुष्याच्या या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!!!