कलाकर नेहमीच पायाला भिंगरी बांधल्यासारखे काम करत असतात. कधीकधी कलाकारांना एकाच वेळी एकाहून जास्त मालिका, शो, जाहिरात यांच्या शूटिंगसाठी सतत या सेटवरून त्या सेटवर जावे लागते. वेळेच्या शिफ्टची गणित सांभाळावी लागतात. बर या सगळय़ा धावपळीत फिटनेसकडेही लक्ष दय़ावे लागते. टापटीप दिसावे लागते. चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशलमीडियावर अॅक्टीव्ह रहावे लागते. एवढं सगळं करून सेलिब्रिटी हा टॅग लागत असतो. दिवसभर ही सगळी लढाई करून कलाकरांना रात्री घरी येण्याची ओढ लागलेली असते. अभिनेता स्वप्नील जोशी देखील अशाच ओढीने घरी येतो तेव्हा त्याच्या घरी रोज रात्री एक वेगळाच प्रकार घडतो. गेल्या काही दिवसांपासून तर हे सातत्याने घडत आहे. शेवटी हा प्रकार शूट करून चाहत्यांना सांगण्याचा मोह त्याला आवरला नाही आणि त्याने या प्रकाराचे व्हिडिओ शूटिंग करून त्याच्या इन्स्टापेजवर बुधवारी रात्री पोस्ट केला आहे.

स्वप्नीलच्या बाबतीत असं काय घडतंय हे पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनीही भुवया उंचावल्या. स्वप्नील रोज रात्री जेव्हा शूटिंग आटपून घरी येतो आणि दारावरची बेल वाजवतो तेव्हा त्याची मुलगी मायरा आणि मुलगा राघव दार उघडतात. स्वप्नील आत आला की त्याच्या हातात मुलं एक चिठठी देतात. स्वप्नील जेव्हा ही चिठठी उघडून पाहतो तर त्यात जे लिहिलेलं असतं ते वाचून त्याला जे वाटते तेच त्याने या व्हिडिओमधून शेअर केले आहे. स्वप्नीलची मुलगी मायरा त्याच्या हातात जे पत्र देते त्यामध्ये असं लिहिलेलं असतं, वेलकम बॅक होम डॅडू… आय लव्ह यू. स्वप्नीलने त्याच्या व्हिडिओची सुरूवातच अशी केली आहे की, गेल्या काही दिवसांपासून मी घरी आल्यावर एक प्रकार घडत आहे आणि आज तो मला तुम्हाला दाखवायचा आहे. माहित नाही आज तो प्रकार घडेल का, पण कदाचित घडेल. आणि दार उघडताच मायरा आणि राघव या त्याच्या मुलांकडून ती खास चिठठी स्वप्नीलला मिळाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा प्रकार शूट करून पोस्ट केल्यानंतर स्वप्नीलने असंही म्हटलं आहे की, शूटिंग करून कितीही कंटाळून घरी आल्यावर जर असं स्वागत होणार असेल तर अजून काय पाहिजे आयुष्यात… त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांनी खूप कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी सिनेमाचा चॉकलेट बॉय अशी इमेज असली तरी स्वप्नील त्याच्या प्रयोगशील व वेगळय़ा कामासाठी मनोरंजन क्षेत्रात ओळखला जातो. मुंबई पुणे मुंबई, दुनियादारी, मितवा, प्यार वाली लव्हस्टोरी या सिनेमातून त्याचा लव्हेबल लूक चांगलाच गाजला. तर समांतर या वेबसिरीजमध्ये त्याने केलेली गंभीर भूमिकाही लक्ष वेधून घेणारी होती. सध्या तो चला हवा येऊ दया या शोमध्ये दिसतोच, तर लवकरच त्याची तू तेव्हा तशी ही मालिका पडदय़ावर येणार आहे ज्यामध्ये तो अभिनेत्री शिल्पा तुळसकरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. त्याच्या या मालिकेचे प्रोमो सध्या जोरदार चर्चेत आहेत. स्वप्नील नेहमीच त्याच्या कुटुंबातील प्रसंग, मुलांसोबतचे क्षण सोशलमीडियावर शेअर करत असतो. त्याचे फॅमिलीबाँडिंग त्याच्या चाहत्यांना पहायला आवडते. त्यातच त्याने शेअर केलेली ही पोस्ट फारच भावनिक झाली आहे.