मन उडू उडू झालं या मालिकेत सानिकाने कार्तिक सोबत लग्न केले आहे. हे लग्न घरच्यांना कळावे म्हणून सानिका नेहमी प्रयत्न करताना दिसत असते. आता तर तिने चक्क प्रेग्नंन्ट असल्याचेच नाटक केलेले आहे त्यामुळे तरी किमान कार्तिकसोबतचे तिचे लग्न मान्य करतील अशी खात्री तिला वाटत आहे. मात्र दिपू ह्या सर्व गोष्टींचा उलगडा होऊ न देण्यासाठी धडपडताना दिसत आहे. अशातच सानिकाला बघायला आलेल्या मुलाला म्हणजेच अमित ला दिपू नकार द्यायला लावते. मात्र दिपूने सांगितलं म्हणून मी सानिकासोबत लग्न करायला नकार देतोय हे अमित उघड करून सगळ्यांनाच अचंभीत करून टाकतो.

अर्थात यानंतर सानिकाच्या कार्तिक सोबत झालेल्या लग्नाचा खुलासा घरच्यांसमोर होणार का हे येत्या काही भागातच स्पष्ट होईल. तूर्तास मालिकेत अमितचे पात्र साकारणाऱ्या नायकबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… मालिकेत अमितची भूमिका साकारली आहे अभिनेता अनिल राजपूत याने. अनिल राजपूत हा हिंदी मराठी मालिका अभिनेता आहे. तसेच त्याने जाहिरात क्षेत्रात देखील काम केले आहे. अनिल राजपूत हा मुंबईतच लहानाचा मोठा झाला. के जी जोशी कॉलेज आणि एन जी बेडेकर कॉलेजमधून त्याने शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच अनिलने विविध नाट्य स्पर्धा आणि एकांकिका मधून सहभाग दर्शवला होता. नवख्या कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळवून देणारे अभिनय कट्टा या खुल्या व्यासपीठाअंतर्गत त्याने नाटकातून सहभाग दर्शवला. प्रेमा तुझा रंग कसा, महाराष्ट्र जागते रहो अशा मराठी मालिकांमधून तो छोट्या मोठ्या भूमिका साकारताना दिसला. पिंजरा खूबसुरती का , मेरे साईं या हिंदी मालिकेतूनही तो छोट्या पडद्यावर झळकला . सागरिका म्युजिक प्रस्तुत ‘मन हे गुंतले’ या व्हिडीओ सॉंगमधून अनिल राजपूत मुख्य भूमिकेत दिसला होता.

रितेश देशमुख प्रथमच दिग्दर्शन करत असलेल्या ‘वेड’ या आगामी मराठी चित्रपटात अनिल राजपुतला महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. २२ ऑगस्ट २०२२ रोजी वेड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटला येणार आहे. या चित्रपटाचे आणखी एक खास वैशिष्ट्य असे की रितेशची पत्नी म्हणजेच जेनेलिया देशमुख या चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. रितेश देशमुखने या चित्रपटाचे नाव जाहीर करताच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटाबाबत अनिल देखील तितकाच उत्सुक आहे. मन उडू उडू झालं या मालिकेतून त्याने अमितची भूमिका सुरेख साकारलेली पाहायला मिळाली. ही भूमिका छोटीशी जरी असली तरी आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्याने ती तितकीच उठावदार केलेली पाहायला मिळत आहे.