मालिकेच्या वेगवेगळ्या ट्विस्टमधून नेहमी रंजक घडामोडी प्रेक्षकांसमोर आणल्या जातात. कथानक वाढवण्याचा आणि मालिकेचा टीआरपी वाढवण्यासाठीचा हा सर्व एक खटाटोप असतो. मात्र या ट्विस्टमधून अनेकदा नवख्या कलाकारांची एन्ट्री होते तर कधी कोणत्या कलाकाराची एक्झिट देखील घडून येते. विशेष म्हणजे हिंदी मालिकांमधून असे ट्विस्ट सर्रास पाहायला मिळतात. झी मराठी वाहिनीवरील लागीरं झालं जी या मालिकेतून असाच प्रसंग पाहायला मिळाला होता. या मालिकेतून पुष्पा मामी आणि जयडीचे पात्र साकारणाऱ्या कलाकारांमध्ये बदल करण्यात आले होते. त्यावेळी या भूमिकेत दुसऱ्याच कलाकारांना पाहून प्रेक्षकांना मात्र मोठा धक्काच बसला होता.

मन उडू उडू झालं या मालिकेत असाच एक धक्कादायक ट्विस्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सानिका प्रेग्नंन्ट नाहीये हे दिपूला समजते मात्र आता आपलं भांडं फुटणार या भितीने सानिका देशपांडेच्या घरात राडा घालताना पाहायला मिळणार आहे. आपलं प्रेग्नंन्ट नसणं उघड होऊ नये म्हणून ती दुसऱ्यांवरच ओरडत कार्तिकला सोबत घेऊन घरी निघून जाते. तिथेच दीपिका तिची समजूत घालायला तिच्या मागोमाग जाते. मात्र संतापाच्या भरात सानिका दिपूला घरातून हाकलून लावते. दीपिकाला ढकलून देत असताना ती रस्त्यावर जाऊन पडते. तेवढ्यात रस्त्यावर भरधाव वेगात येत असलेले वाहन तिला येऊन धडकते. यात दिपूला गंभीर दुखापत होते आणि रक्तबंबाळ होऊन ती बेशुद्ध पडते. मालिकेच्या पुढील भागात प्रेक्षकांना हा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मात्र हा ट्विस्ट एका वेगळ्याच कारणासाठी तर मालिकेत घुसडला नाही ना अशी पुसटशी शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. कारण नुकतेच दीपिकाची भूमिका साकारणारी हृता दुर्गुळे प्रतीक शाह सोबत विवाहबद्ध झाली आहे. मालिकेतून ब्रेक मिळाला म्हणून हा ट्विस्ट आणला असे आता स्पष्ट होत असले तरी हा ट्विस्ट वेगळे काहितरी सांगून जाताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेच्या सेटवर स्वच्छतेच्या कारणावरून हृता आणि निर्मात्या टीमचा वाद झाला होता. त्यांनतर हृता मालिका सोडणार असे बोलले जात होते. परंतु मालिकेतील तिचे ऍग्रिमेंट संपले नसल्याने तिला अजून काही दिवस तरी शूटिंग करावे लागणार होते. त्यामुळे या ट्विस्टमध्ये हृता मालिका सोडणार का? अशी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

अर्थात नुकतेच लग्न झाल्याने हृता मालिकेतून ब्रेक घेणार हे जरी उघड उघड असले तरी येत्या काही दिवसात मालिकेत दिपूच्या भूमिकेत दुसऱ्याच नायिकेला पाहावे लागू नये अशी प्रेक्षकांची एक माफक अपेक्षा आहे. हृताने तिच्या सहजसुंदर अभिनयाने दिपूची भूमिका प्रेक्षकांच्या मनात चांगली रुजवली आहे. तिने ही मालिका सोडली तर प्रेक्षक नक्कीच नाराज होणार आहेत. याबाबत हृताने मीडियाशी बोलताना मालिका सोडणार नसल्याचे म्हटले होते मात्र याबाबतचे सत्य काय आहे हे येत्या काही दिवसातच प्रेक्षकांना उलगडणार आहे. मालिकेतील कार्तिक म्हणजेच अभिनेता ऋतुराज फडके याची सोशल मिडियावरची एक पोस्ट असेच काही संकेत देताना दिसत आहे. त्याने या मालिकेबाबत म्हटले आहे की, ‘ हा सिन शूट करताना स्वतःला प्रचंड वेदना झाल्या होत्या, आता मन उडू उडू ह्या मालिकेत इथून पुढे मोठं मोठ्या घटना घडणार आहेत’…हे त्याचे म्हणणे असेच काहीसे घडणार का? याचे संकेत देत आहे.