मन उडू उडू झालं या मालिकेला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. सानिका आणि कार्तिकच्या लग्नाची बातमी आता देशपांडे कुटुंबाला समजली आहे. त्यामुळे देशपांडे सर सानिकावर चिडलेले असतात आणि तिला घरातून हाकलून लावतात मात्र सानिका प्रेग्नंट आहे हे दीपिका सांगते त्यावेळी देशपांडे सरांना काय करावं हेच नेमकं सुचत नसतं. या घटनेमुळे सध्या देशपांडे आणि साळगावकर कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण आहे. हा सिन शूट करत असताना सेटवर एक प्रसंग घडला त्यावेळी सानिकाने मजेशीर कॅप्शन देऊन आपल्या आईला ‘बुमराह’ची उपमा दिलेली पाहायला मिळाली. हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात..

सानिकाची भूमिका अभिनेत्री रिना अगरवाल हिने साकारली आहे. तर या मालिकेत सानिकाच्या आईची म्हणजेच मालतीची भूमिका अभिनेत्री रुपलक्ष्मी शिंदे यांनी साकारली आहे. मालिकेत सानिकाच्या वागण्यामुळे तिच्या आईला राग आलेला असतो. संतापाच्या भरात त्या टेबलावरचा ग्लास उचलतात आणि सानिकाच्या अंगावर फेकतात असा एक सिन शूट करायचा होता. या सीनमध्ये रुपलक्ष्मी यांनी उचललेला ग्लास रिनाच्या पायाला खरोखरच लागतो. अर्थात या जोरदार फटाक्यामुळे रिनाला थोडासा त्रास जाणवू लागला होता मात्र ग्लास चुकून लागल्याचे लक्षात येताच रुपलक्ष्मी रिनाकडे धाव घेताना दिसतात. आणि काळजीपोटी तिची चौकशी करतात. अर्थात रिनाने देखील त्यांच्या या स्टंटवर मजेशीर कॅप्शन सुचवलेले पाहायला मिळाले. सेटवरचा घडलेला हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे तिने कार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात रीना म्हणते की, ‘आईने केली बॉलिंग उडवला माझा लेग स्टंप! असे स्टंटस वाले सीन्स करताना धड धड होतो हार्ट पंप!..’ असे म्हणत रिनाने आईला चक्क भारतीय क्रिकेटर बुमराह ची उपमा देऊ केली आहे.

रिनाच्या या मजेशीर कॅप्शनवर मराठी सेलिब्रिटींनी आणि तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अर्थात काळजीपोटी यातून तिला काही दुखापत तर झाली नाही ना? अशीही विचारणा केलेली पाहायला मिळत आहे. मन उडू उडू झालं या मालिकेला बरेचसे जाणकार मंडळी लाभले आहेत त्यामुळे या सर्वांच्यात खूप चांगले बॉंडिंग जुळून आलेले पाहायला मिळते. रुपलक्ष्मी यांचा सेटवरचा वावर देखील त्यांच्या शांत आणि विनोदी स्वभावाला अनुसरून आहे त्यामुळे रिनाला चुकून ग्लास लागताच त्यांनी आपली जीभ दाताखाली धरून तिच्याकडे धाव घेतलेली पाहायला मिळाली. नजरचुकीने असे प्रसंग सेटवर अनेकदा घडत असतात मात्र त्यातूनही हलकं फुलकं वातावरण निर्माण करण्याचे काम रिनाने केलेले पाहायला मिळाले.