मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेत्रीने पंचतारांकित हॉटेलची गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात येण्याचे धाडस दाखवले. सध्या झी मराठी वाहिनीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत इंद्राच्या बहिणीची म्हणजेच मुक्ताची भूमिका साकारत आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे प्राजक्ता परब. हॉटेलमध्ये नोकरी करत असताना खेळाडूंची सर्व जबाबदारी देखील तीच पाहत होती. पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत असताना प्रजक्ताला अभिनयाचे वेध लागले. या क्षेत्रात येण्यासाठी तिने घरच्यांकडून थोडा वेळ मागितला होता. या काळात प्रजक्ताने हळूहळू जाहिरात क्षेत्रात आपला जम बसवण्यास सुरुवात केली होती.

अगदी कार्तिक आर्यनसोबत तिने एंगेज डिवोची ऍड केली होती. सेन्टरफ्रेश, महाराष्ट्र शासनाची वेस्ट नो मोअर, weikfield dessert, जिओ मार्ट अशा जाहिरातीतून तिला झळकण्याची संधी मिळत गेली. पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत असताना रजनीकांत, नाना पाटेकर या दिग्गज कलाकारांसोबत तिची चांगली ओळख झाली होती मात्र तरी देखील स्वतःच्या बळावरच कला क्षेत्रात येण्याचे धाडस तिने दाखवले होते. व्यावसायिक जाहिरातीमुळे प्रजक्ताला प्रसिद्धी मिळत गेली. या व्यावसायिक जाहिरातीत काम करत असताना पुढे ललित २०५, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिका आणि माझ्या मित्राची गर्लफ्रेंड या वेबसिरीजमध्ये प्राजक्ताला महत्वाच्या भूमिका साकारण्याची नामी संधी मिळाली. मन उडू उडू झालं या मालिकेचे दिगदर्शन मंदार देवस्थळी करणार असल्याचे तिला कळले त्यामुळे त्यांच्या मालिकेत काम करता यावं म्हणून तिने या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. त्यात तिला इंद्राच्या बहिणीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मुक्ता ही भूमिका थोडीशी अल्लड असली तरी पुढे जाऊन ती इंद्रा आणि दिपूच्या नात्यातील दुवा बनणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे ९ जानेवारी २०२१ रोजी प्राजक्ता परब दिग्दर्शक आणि लेखक असलेल्या अंकुश मरोडे यांच्यासोबत विवाहबद्ध झाली. सध्या झी मराठी वाहिनीवरील ती परत आलीये या मालिकेचे दिग्दर्शन अंकुश मरोडे करत आहे. आता लवकरच ती परत आलीये ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे परंतु एक उत्कृष्ट दिगदर्शक म्हणून अंकुशने आपली जबाबदारी चोख बजावली असल्याचे या मालिकेतून दिसत आहे. अंकुशने या अगोदर हिंदी मालिकांसाठी काम केलं आहे. असिस्टंट डायरेक्टरची भूमिका निभावत असताना त्याने सड्डा हक, लाल ईश्क, ऐसी दिवानगी देखी नहीं कहीं या हिंदी मालिका केल्या आहेत. सात वर्षे हिंदी मालिकेत काम करत असताना एक घर मंतरलेलं या मालिकेतून त्याने मराठी सृष्टीत पाऊल टाकलं होतं. माझ्या मित्राची गर्लफ्रेंड, माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचं २० ते २५ दिवसाच काम त्याला करायला मिळालं होतं.