
झी मराठी वाहिनीवर “मन उडू उडू झालं” ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेत अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने दीपाची भूमिका तर अभिनेता अजिंक्य राऊत याने इंद्रची भूमिका साकारली आहे. या मालिकेला अरुण कदम, रुपलक्ष्मी चौगुले, पूर्णिमा तळवळकर या कसलेल्या कलाकारांची देखील साथ मिळाली आहे. मालिकेत देशपांडे कुटुंबात शलाका, सानिका आणि दीपा अशा तीन मुली दाखवल्या आहेत. लवकरच शलाका लग्न करून अमेरिकेला जाणार असल्याने देशपांडे कुटुंबात तिच्या लग्नाची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. मात्र शलाकाच्या सासरच्यांकडून त्यांच्या लग्नासाठी नको ती मागणी केली जात आहे.

ही मागणी पूर्ण करता करता देशपांडे कुटुंबाला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यात आता पिशवीत ठेवलेले पैसे देखील लुटले गेल्याने शलाकाचे लग्न होणार की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. मालिकेत शलाकाचे पात्र थोडेसे घाबरट आणि राडूबाई प्रमाणे दर्शवले आहे. ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री “शर्वरी कुलकर्णी” हिने. शर्वरी कुलकर्णी हिने या मालिकेअगोदर सोनी मराठी वाहिनीवरील ‘आनंदी हे जग सारे’ ह्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यात तिने मीरा ची भूमिका साकारली होती. शर्वरी उत्तम डान्सर असून अभिनयाचे तिने धडे गिरवले आहेत. नाटकांमधूनही ती याआधी प्रेक्षकांसमोर आली होती. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी विभव बोरकर याच्याशी ती विवाहबद्ध झाली. शर्वरी कुलकर्णी ही मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री “संपदा कुलकर्णी” यांची मुलगी आहे. संपदा कुलकर्णी या मराठी चित्रपट, मालिका तसेच नाट्य अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. अनेक मंचावरून त्यांनी सुत्रसंचालिकेची भूमिका देखील निभावली आहे.

गेल्या काही वर्षांपासून संपदा कुलकर्णी या आपले पती राहुल कुलकर्णी यांच्यासोबत कोकणातील गावी राहत आहे. तिथे त्या शेती क्षेत्रात गुंतलेल्या पाहायला मिळत आहेत. ‘आनंदाचं शेत’ या माध्यमातून त्या इतरांना देखील शेती व्यवसायात येण्यास प्रोत्साहन देत आहेत. आजवर प्रसार माध्यमातून त्यांच्या आनंदाचं शेत या प्रोजेक्टची माहिती दिली गेली आहे त्यामुळे संपदा कुलकर्णी या अभिनय सोडून शेती क्षेत्राकडे वळलेल्या अभिनेत्री म्हणून चर्चेत आल्या होत्या. आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची मुलगी शर्वरी ही देखील अभिनय क्षेत्रात आपला जम बसवू पाहत आहे. मन उडू उडू झालं या मालिकेतील शलाकाच्या भूमिकेसाठी “शर्वरी कुलकर्णी” हिला खूप खूप शुभेच्छा….