
सध्या अनेक मालिकांमध्ये नव्या पात्रांची एन्ट्री होत आहे तर काही कलाकार मालिका सोडत आहेत. अर्थात मालिकेत नव्याने येणाऱ्या कलाकारांचं जसं स्वागत होतं तस मालिका सोडणाऱ्या कलाकारांना निरोपही दिला जातो. एकूणच काय तर मालिकांच्या राज्यात असं येणंजाणं सुरूच असतं. मालिका सोडून जाताना कुणाचे वाद होतात तर कुणाला नवा प्रोजेक्ट मिळतो या कारणाने मालिकेतून बाहेर पडणाऱ्या कलाकारांच्या जागी नवे कलाकार येतात आणि मालिका सुरू राहतात. प्रेक्षकांच्या मात्र मनात कलाकारांच्या आठवणी कायम असतात. असाच एक सीन मन उडू उडूच्या सेटवर नुकताच झाला पण हा सीन कॅमेऱ्यासमोर नव्हे तर कॅमेऱ्यामागे झाला. या मालिकेतील कानविंदे कुटुंबाची नुकतीच मालिकेतून एक्झिट झाल्याने शलाका देशपांडेच्या सासरच्या मंडळीना मालिकेच्या टीमने निरोप दिला.

मन उडू उडू झालं या मालिकेत इंद्रा आणि दीपू यांच्या प्रेमाची गोष्ट सांगितली आहे. पण त्यासोबत इतर भूमिका करणारे कलाकारही मालिकेच्या कथेत महत्वाचे आहेत. यामध्ये दीपूची बहिण शलाका हिचा नवरा नयन कानविंदे, त्याची आई स्नेहलता आणि वडील विश्वासराव यांच्या भूमिकांचा ट्रॅक संपल्याने हे त्रिकूट आता मालिकेत दिसणार नाही. ए शलाका, जास्त शहाणपणा करू नकोस हा असं म्हणणारा नयन, हो किनई ओ नयनचे पप्पा हा डायलॉग लोकप्रिय करणारी स्नेहलता आणि आम्हाला साधे समजू नका असं म्हणून मान हलवणारे विश्वासराव ही पात्र चांगलीच गाजली. पडदयावर एकमेकांना पाण्यात पाहणारे कानविंदे कुटुंब आणि इंद्रा यांनी या निरोपाच्या क्षणी फोटो काढून शुभेच्छा दिल्या. नयनची भूमिका अमित परब याने साकारली. एका कार्पोरेट कंपनीत नोकरी करणाऱ्या अमितने त्याच्या कामातून वेळ काढून या भूमिकेला न्याय दिला. तर शलाकाचा छळ करणारी सासू स्नेहलता ही भूमिका कस्तुरी सारंग यांनी छान निभावली. या दोन्ही भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. मालिकेतील खलनायक म्हणून या पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. मालिका सुरू झाल्यानंतरच्या काही एपिसोडनंतर कानविंदे कुटुंबाची एन्ट्री झाली होती.

२०० एपिसोडमध्ये नयन, स्नेहलता आणि विश्वासराव हे त्रिकूट होते. नुकतच या कलाकारांनी त्याच्या शेवटच्या एपिसोडचं शूटिंग पूर्ण केलं. तर इंद्र देखील बेंगलोर येथे काही दिवसाच्या शूटिंगसाठी बाहेर गेला आहे. त्यामुळे तो देखील मालिकेत काहीकाळासाठी पाहायला मिळणार नाही. नयनची भूमिका करणारा अमित म्हणाला, या मालिकेने मला घराघरा पोहोचवलं. त्याआधी मी खूप ऑडीशन्स दिल्या होत्या, पण माझी निवड होत नव्हती. मन उडू उडू झालं यासारख्या लोकप्रिय मालिकेचा एक भाग होता आलं याचं समाधान आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. जरी मालिकेतील माझा सहभाग संपला असला तरी प्रत्येक कलाकाराशी असलेलं नातं कायम राहिल. यावेळी अमित खूप भावुक झाला होता.